उमेदवार आज उभारणार निवडणूक प्रचाराची गुढी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2019 05:01 AM2019-04-06T05:01:48+5:302019-04-06T05:02:19+5:30

शोभायात्रांमध्ये सहभाग : देशभक्तीच्या थीमवर प्रचार

Candidates will be set up today's election campaign | उमेदवार आज उभारणार निवडणूक प्रचाराची गुढी

उमेदवार आज उभारणार निवडणूक प्रचाराची गुढी

googlenewsNext

ठाणे : गुढीपाडव्यानिमित्त शनिवारी ठाणे, डोंबिवली, कल्याण, बदलापूर आदी शहरांमध्ये आयोजित स्वागतयात्रा, शोभायात्रांमध्ये सहभागी होऊन बहुतांश उमेदवार आपल्या निवडणूक प्रचाराची गुढी उंचावण्याचा प्रयत्न करणार आहेत. हा सोहळा राजकारणविरहित असला तरी माहोल निवडणुकीचा असल्याने उमेदवार लोकांमध्ये मिसळून आपला संदेश अप्रत्यक्षपणे पोहोचवण्याचा प्रयत्न करतील, असेच संकेत प्राप्त होत आहेत. त्यातच, या सोहळ्याच्या आयोजकांनी बहुतांश शहरांमध्ये देशप्रेमाशी जोडून अनेक उपक्रम आयोजित केल्याने सध्या निवडणूक प्रचारात अग्रेसर असलेला राष्ट्रवादाचा मुद्दा येथेही पुढे राहणार आहे.

मागील लोकसभा निवडणुकीला डोंबिवलीतील गुढीपाडव्याच्या मिरवणुकीत तत्कालीन उमेदवार सहभागी झाले होते. त्यामुळे उद्याही ठाणे, कल्याण व भिवंडी लोकसभा मतदारसंघातील प्रमुख पक्षांचे उमेदवार हे शोभायात्रांमध्ये सहभागी होतील, अशी चर्चा आहे. काही उमेदवारांनी शोभायात्रांमध्ये सहभागी होण्याचे वेळापत्रक आखले आहे. या शोभायात्रांमध्ये सहभागी होणाऱ्या लक्षावधी लोकांच्या भेटीगाठी घेण्याची उमेदवारांकरिता ही मोठी संधी असते. त्यामुळे बहुतांश उमेदवार ती दवडणार नाहीत, असे संकेत प्राप्त होत आहेत. आचारसंहितेमुळे अशा सोहळ्यांमध्ये थेट प्रचार करणे शक्य नसले, तरी अप्रत्यक्ष प्रचार केला जाऊ शकतो. पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात चाळीसहून अधिक जवान शहीद झाले. त्यानंतर, भारतीय लष्कराने बालाकोट येथील दहशतवादी संघटनेचे तळ उद्ध्वस्त केले. या मुद्द्यावरून सत्ताधारी विरुद्ध विरोधी पक्षात दावे-प्रतिदावे व आरोप-प्रत्यारोप सुरू असले, तरी बहुतांश शोभायात्रा आयोजकांनी राष्ट्रप्रेम, राष्ट्रवाद हीच थीम घेतली आहे. गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या दीपोत्सवानिमित्तही एक पणती सैनिकांकरिता, अशी संकल्पना राबवली गेली. उद्याच्या शोभायात्रा, स्वागतयात्रांमधील चित्ररथ हे सैन्याच्या शौर्यगाथांवर प्रकाश टाकणारे असतील. त्यामुळे उमेदवार आपल्या प्रचाराकरिता हा राष्ट्रवादाचा मुद्दा खुबीने वापरतील, असे संकेत प्राप्त होत आहेत.

निवडणूक आयोगाची राहणार नजर
गुढीपाडव्याच्या मिरवणुकांमध्ये उमेदवार व त्यांचे समर्थक सहभागी होणार असल्याने निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी या मिरवणुकांवर बारीक नजर ठेवणार आहेत. तसेच पुलवामाच्या घटनेनंतर अनेक प्रमुख शहरांमध्ये दहशतवादी हल्ल्यांचा इशारा गुप्तचर संघटनांनी यापूर्वीच दिला असल्याने पोलीस बंदोबस्त चोख असणार आहे. मिरवणुकीत सहभागी होणाºया नागरिकांनी सणाचा आनंद घेताना सतर्क राहावे, असे आवाहन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी केले आहे.

Web Title: Candidates will be set up today's election campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.