गांजाची तस्करी करणाऱ्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:42 AM2021-07-30T04:42:08+5:302021-07-30T04:42:08+5:30
ठाणे: मोटारसायकलीवरून गांजाची तस्करी करणाऱ्या मोहमद अलीयाजगार मोनडल (२१, रा. खिडकाळी, ठाणे) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या मध्यवर्ती गुन्हे ...
ठाणे: मोटारसायकलीवरून गांजाची तस्करी करणाऱ्या मोहमद अलीयाजगार मोनडल (२१, रा. खिडकाळी, ठाणे) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या मध्यवर्ती गुन्हे शोध पथकाने गुरुवारी पहाटे अटक केली. त्याच्याकडून मोटारसायकल आणि १५ किलोच्या गांजासह तीन लाख ४७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
पनवेल ते मुंब्य्राकडे जाणाऱ्या मार्गावर गोटेघर येथे एक व्यक्ती गांजा विक्रीसाठी येणार असल्याची टिप मध्यवर्ती गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार रोहन म्हात्रे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल होनराव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अशोक शेंडगे, पोलीस उपनिरीक्षक दिनेश शेलान, पोलीस हवालदार संदीप शिर्के आणि प्रमाद जाधव आदींच्या पथकाने २८ जुलै रोजी दुपारी ४.३० वाजण्याच्या सुमारास गोटेघर, उत्तरशिव येथे मोटारसायकलीवरून आलेला आरोपी अलीयाजगार याला ताब्यात घेतले. सखोल चौकशीत मोटारसायकलसमोरील मोकळ्या जागेत ठेवलेली गांजाची गोणी त्याच्याकडून हस्तगत करण्यात आली. या गोणीतून दोन लाख ९९ हजारांचा १५ किलोचा गांजा याशिवाय सहा हजार ८२० इतकी रोकड, मोबाईल आणि एक मोटारसायकल असा तीन लाख ४७ हजार ३२० रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी डायघर पोलीस ठाण्यात २९ जुलै रोजी एनडीपीएस कायदा १९८५ चे कलम ८ (क) तसेच मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी मोनडल याला ३ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.