दोन रुपयांसाठी अंध भिकाऱ्यावर कॅन्टीन चालकाचा हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:41 AM2021-04-27T04:41:59+5:302021-04-27T04:41:59+5:30
कल्याण : आठ रुपयांचा समोसा दहा रुपयांला का देतो, अशी विचारणा केली म्हणून कॅन्टीन चालकाने एका अंध भिकाऱ्यावर धारदार ...
कल्याण : आठ रुपयांचा समोसा दहा रुपयांला का देतो, अशी विचारणा केली म्हणून कॅन्टीन चालकाने एका अंध भिकाऱ्यावर धारदार शस्त्राने वार केल्याची घटना अंबरनाथ स्थानकात घडली आहे. जखमी भिकाऱ्याचे नाव दिलीप मोरे असे आहे. कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
अंबरनाथमध्ये राहणारे मोरे हे अंध आहेत. भीक मागून कुटुंबाचे पोट करतात. रविवारी संध्याकाळी मोरे त्यांच्या मित्रासोबत अंबरनाथ स्थानकाच्या फलाटावर चर्चा करीत असताना त्यांनी एका कॅन्टीनमधून समोस घेतला. कॅन्टीन चालकाने या समोशाचे दहा रुपये मागितले. मोरे यांनी आठ रुपयांचा समोसा दहा रुपयाला कसा काय देता असा सवाल केला. या कारणावरून कॅन्टीन चालक आणि दिलीप मोरे यांच्यात वाद सुरू झाला. यातून कॅन्टीन चालक मंगलसिंग कुशवाह याने तीक्ष्ण धारदार शस्त्राने मोरेवर प्रहार केला. या हल्ल्यात त्याच्या उजव्या हाताच्या बोटाला गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी कायदेशीर कारवाई केली जाईल, असे कल्याण जीआरपीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाणे यांनी सांगितले.