सक्षम बालके भविष्य देशाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 03:59 AM2018-08-28T03:59:50+5:302018-08-28T04:01:50+5:30

मी ज्या डब्यात बसलो आहे ना, तिथे एक मुलगा घाबरलेला दिसत आहे व एकटाच आहे असे दिसतेय. काही करता येईल का? असा फोन आमच्या अ‍ॅक्टिव्हिटीचा भाग असणाऱ्या समतोल मित्र ग्रुपमधला

Capable children future country | सक्षम बालके भविष्य देशाचे

सक्षम बालके भविष्य देशाचे

Next

विजय जाधव

विजय सर..... मी ज्या डब्यात बसलो आहे ना, तिथे एक मुलगा घाबरलेला दिसत आहे व एकटाच आहे असे दिसतेय. काही करता येईल का? असा फोन आमच्या अ‍ॅक्टिव्हिटीचा भाग असणाऱ्या समतोल मित्र ग्रुपमधला एका समतोल मित्र अभिजित याचा आला. मी विचारले, स्टेशन कोणते? तर तो म्हणाला, भुसावळ पॅसेंजर आहे. ठाण्यातून पुढे निघाली आहे. आम्ही लगेच भुसावळच्या समतोल टीमशी संपर्क केला व मुलाला मदत होईल का असे बघितले. पण त्याहीपेक्षा ट्रेनमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी नेमलेले आर.पी.एफ.चे जवान यांना माहिती देण्याविषयी मी सूचना केली. परंतु समोरून अर्धा तासाने फोन आल्यावर अभिजितला अगोदरच उतरायचे होते. म्हणून त्याने आर.पी.एफ.ला मुलाची माहिती देण्याचा प्रयत्न केला. आर.पी.एफ.ने ही मुले रोजच फिरतात म्हणून टाळाटाळ केली. खरेतर, असे प्रसंग रोजच प्रवाशांना येत असतात. अभिजितसारखा समतोल प्रेमी (बालप्रेमी) अशा मुलांविषयी तळमळ व्यक्त करतो. बरेच जण हे पाहून न पाहिल्यासारखे करतात. त्यामुळे अशी समस्या कधी सुटणार याबद्दल मात्र मनात शंका तयार होते.
सध्या समतोल फाउंडेशनचे ३४वे मनपरिवर्तन शिबिर स्वामी विवेकानंद मनपरिवर्तन केंद्रात सुरू आहे. शिबिरात ३० मुले आहेत. प्रत्येक मुलाची स्थानिक स्टेशनवर पोलीस नोंद झाली आहे. शिवाय मुलगा ज्या ठिकाणाहून आलाय तिथे पालकांनी एफ.आय.आर. केली की नाही याची तपासणी सुरू आहेच. समतोल संस्था ही सामाजिक देणगीवर आर्थिक व्यवहार चालवते. त्यामुळे संस्थेच्या संपर्कात हजारो कार्यकर्ते येत असतात व संस्था ‘समतोल मित्र’ या नावाने त्यांना सामाजिक कार्य करण्याची संधी देत असते. अनेक मुलांबरोबर चर्चा केली असता मुलांना जेव्हा विचारले जाते की तुम्ही आले कसे? तेव्हा मुले सहजपणे उत्तर देतात ट्रेनमधून आलो. म्हणजे ट्रेनमध्ये या मुलांना कोणीही विचारत नाही व आपण कुठेही कसाही प्रवास करू शकतो याची त्यांना खात्री असते. कारण अनेक दुसरी मुले त्यांना याबाबत सांगतात म्हणून मुले ट्रेनमध्ये फिरत असतात व प्रवासी या मुलांना पाहून न बघितल्यासारखे करीत असतात. जणू काही या मुलांचा या देशाशी, समाजाशी काहीही संबंध नाही.

आमच्याकडे बापू (बदललेले नाव) नावाचा ८ वर्षांचा मुलगा आहे. शिबिरात जास्त मस्तीखोर म्हटले तरी चालेल. अनेक मोठ्या मुलांच्या खोड्या करतो. समतोलचे कार्यकर्ते जेव्हा माहिती घ्यायचा प्रयत्न करतात, तेव्हा बापू कार्यकर्त्यांचीच माहिती घेत असतो. कारण बाहेर ट्रेनमध्ये फिरून बापू जास्तच हुशार झालेला आहे. सांगताना तो कधी यूपीचा सांगतो, तर कधी नांदेडचा, कधी मुंबई तर कधी पुण्याला राहतो सांगतो. नक्की कुठे राहतो, हे अजून तरी आम्हाला समजलेले नाही. कारण हा बापू मराठी, हिंदी, कन्नड, तेलुगू, गुजराती, बंगाली अशा किमान पाच ते सहा भाषा बोलतो. यापैकी कोणतीही भाषा बापूला पूर्णपणे येत नाही. पण संवाद साधताना मात्र तो त्याच भाषेतला आहे की काय? असे वाटते. माणूस ओळखणे व माणसांना आपलेसे करणे याची उत्तम कला बापूकडे आहे. त्यामुळे तो म्हणतो, सर मी आजपर्यंत बाहेर राहून कोणाचाही मार खाल्ला नाही. पोलिसांची कामे करतो, मोठ्यांना भाई मानतो, पब्लिकमध्ये ताई, भाऊ, सर म्हणत सर्वांची मने जिंकतो. दिवसाला किमान १५० रुपये कमवतो, असे आवर्जून सांगतो. या पैशाचे काय करतो? असे विचारल्यावर खाऊन टाकतो म्हणतो. पण रोज किती पैसे खर्च करणार म्हणून कधी स्टेशनवर अंध व्यक्ती ज्या फिरतात त्यांना देतो असे सांगतो. कुणी शिकवली त्याला संवेदनशीलता? पण व्यक्तीमध्ये हा नैसर्गिक गुण असतोच आणि तो आपण नेहमी जागृत ठेवला पाहिजे.
काही मुले औपचारिक शिक्षण न घेता हे गुण जपतात, परंतु जी मुले औपचारिक शिक्षण घेतात त्या मुलांमध्ये हे गुण कमी आहेत की काय? किंवा त्यांना कमी करण्यास आपणच भाग पडतो की काय, असा प्रश्न स्टेशनवरचे चित्र सांगते. अनेक लोक संवेदनशीलतेपासून दूर होत चालले आहेत की काय? असाही विचार मनात येतो. कारण मुलांकडे बघून न बघितल्यासारखे यंत्रणा, अधिकारी व समाज करतात. म्हणून ही समस्या कमी होण्याऐवजी वाढतच चालली आहे. कुठे हरवली आपली संवेदनशीलता?

बापूच्या घराचा शोध लागेल किंवा नाही हा नंतरचा विषय आहे. परंतु ज्याप्रमाणे तो बोलतो, वागतो हे पाहून आपलेही मन भारावते. चांगली दिशा मिळाली तर ही मुले समाजात पुढे जाऊ शकतात. अन्यथा स्वत:बरोबर समाजाचे नुकसान करू शकतात. हे आपण विसरलो आहोत. रस्त्यावर व स्टेशनवर राहणाºया मुलांच्या समस्यांबाबत थ्री स्टार हॉटेल व एअरकंडिशन आॅफिसमध्ये बसून चर्चा होत असतात. त्यांच्या समस्या फिल्ममधून बघताना आनंद वाटतो, हे वास्तव नाकारता येत नाही.

महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमध्ये मुलांसाठी प्रत्येक जिल्ह्यात किमान ८ विभाग कार्यरत आहेत. त्यामध्ये बालकल्याण समिती, बाल संरक्षण कक्ष, बालकामगार विभाग, जिल्हा महिला व बाल विभाग, एकात्मिक बालविकास, स्पेशल बाल पोलीस अधिकारी विभाग, अनैतिक मानवी व्यापार विभाग, बालविवाह प्रतिबंध कायदा व त्यासाठीचा विभाग असे अनेक विभाग कार्यरत आहेत. एवढे असूनही समस्या कमी होताना दिसते का? असा प्रश्न जनतेला विचारला तर त्याचे उत्तर नाही असेच असेल. यंत्रणेने सक्षमपणे काम केले नाही तर समस्या कमी होणारच नाही. कुटुंब व कुटुंबातील व्यक्ती सक्षम तर देश सक्षम राहील. यासाठी सर्वांनीच पुढाकार घेऊन बालके सक्षम करण्याची गरज आहे.

दळणवळणाचे साधन म्हणून ज्या रेल्वेने जाळे पसरवले आहे, त्या रेल्वे यंत्रणेमध्ये हा विषय जास्त संवेदनशील झाला पाहिजे. फक्त मुलांचे मदत केंद्र उभे करून चालणार नाही किंवा हेल्पलाइन नंबर जाहीर केला तरी त्या नंबरवर समाजातील सर्व जनतेला त्याचा लाभ घेता येईल असे समजणे चुकीचे होईल, कारण या नोडल संस्था सरकारला खोटे रिपोर्ट देऊन आपली आर्थिक बाजू फक्त भक्कम करून घेतात. परंतु ज्या संस्था प्रामाणिकपणे काम करतात त्यांच्याकडे सरकार दुर्लक्ष करते हे वास्तव आहे. यामध्येसुद्धा सरकारने लक्ष घालून सुधारण्याची गरज आहे. रेल्वे यंत्रणेमध्ये मुलांसाठी तात्पुरती निवास व्यवस्था उभी करणे काळाची गरज आहे. आर.पी.एफ./जी.आर.पी. या यंत्रणेतील बाल हक्कांच्या जनजागृती विषयाची सत्र होण्याची गरज आहे. अन्यथा समाजातील समतोल बिघडत राहील यात शंकाच नाही. ‘मुलांची सुरक्षितता सर्वप्रथम’ हे ब्रीद वाक्य सर्वांसाठी महत्त्वाचे आहे.’
(लेखक महाराष्टÑ राज्याच्या बालहक्क संरक्षण आयोगाचे सदस्य आहेत.) 

आज रेल्वे, रेल्वे स्टेशन आणि तत्सम परिसरात एकटीदुकटी आढळणारी सर्वच मुले ही वाईट वृत्तीची नसतात. त्यांना चांगली संधी, मार्गदर्शन मिळाले तर ती खूप पुढे जाऊ शकतात. मुले ही देशाचे भविष्य आहे, असे आपण मानतो; पण हीच मुले आज सुरक्षित नाहीत आणि समाजाकडूनही दुर्लक्षित होत आहेत. मुलांचे कायदे, हक्क, अधिकार, सुरक्षितता यावर अनेक यंत्रणा काम करीत असतात. मात्र सुरक्षित आणि सक्षम मुलांबरोबरच देशाचे भविष्य घडवायचे असेल तर त्या यंत्रणांनी सक्षमपणे काम करण्याची गरज आहे.

 

Web Title: Capable children future country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.