महापौरांच्या लसीकरणाचे भांडवल, भाजपने केली शहरभर पोस्टरबाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 11:27 PM2021-02-26T23:27:36+5:302021-02-26T23:27:47+5:30
हा कोरोनायोद्ध्यांचा अपमान : डॉक्टरला लस नाकारल्याने टीका
ठाणे : महापौर नरेश म्हस्के यांनी घेतलेल्या कोरोना लसीवरून राजकारण तापले आहे. भाजपने शहरभर पोस्टरबाजी करुन महापौरांवर टीका केली आहे. कोरोनायोद्ध्यांना लस देणे गरजेचे असताना महापौरांचे लाड कशासाठी, असा सवाल या पोस्टरद्वारे केला आहे. दुसरीकडे एका डॉक्टरला मुदत संपल्याचे सांगून लस न देता पिटाळून लावल्याचा प्रकारही समोर आल्याने भाजपच्या हातात आयतेच कोलीत मिळाले आहे.
ठाणेकरांना वाऱ्यावर सोडणाऱ्या महापौर म्हस्के यांनी स्वत: लस घेतली. त्यांच्यासोबत शिवसेनेचे आमदार रवींद्र फाटक यांनी घेतलेली लस म्हणजे सत्तेचा गैरवापर असल्याचा आरोप भाजपने केला आहे. लस सुरक्षित आहे हे सर्वांना समजण्याकरिता ती घेतल्याचा महापौरांचा दावा आहे. मात्र, याबाबत सरकारी आदेश दाखवणार का, असा सवाल करून भाजपचे गटनेते मनोहर डुंबरे यांनी थेट केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांचे या प्रकाराकडे लक्ष वेधले आहे.
ठाणे शहराला पुरवठा केलेली लस सत्तेचा गैरवापर करून आणखी कोणाला दिली आहे का, नक्की किती फ्रंटलाइन वर्कर्सना ती मिळाली, याची चौकशीची मागणी केली आहे. भाजप एवढ्यावरच थांबला नसून त्याने पोस्टरबाजी करून महापौरांवर हल्लाबोल केला आहे. हे पोस्टर महापालिका मुख्यालयासमोरच लावल्याने अनेकांच्या नजरा त्यावर खिळल्या.
कोरोनायोद्धे ठाण्याचा अभिमान, त्यांना सर्वप्रथम लस मिळणे हा त्यांचा अधिकार, सेना आमदार, महापौरांनी लाइनीत घुसून त्यांचा केला अपमान अशा आशयाचा मजकूर या पोस्टरवर आहे. शिवसेना -राष्ट्रवादी भाऊ भाऊ, दोघे मिळून जनतेच्या पैशांवर मजा मारू, असा आशयही पोस्टर झळकत आहे.
पोस्टर्स काढण्याची महापालिकेची लगीनघाई, इतर पोस्टर्स दिसले नाही का - भाजपचा सवाल
ठाणे : महापौर म्हस्के यांनी घेतलेल्या कोरोना लसीबाबत भाजपने शहरभर लावलेले पोस्टर अवघ्या काही तासांतच काढण्याची लगीनघाई शुक्रवारी महापालिकेने केली. यावरून भाजपने सत्ताधारी शिवसेनेवर टीका केली आहे. शहरात सर्वत्र एवढ्या मोठ्या प्रमाणात अनधिकृत पोस्टर असतानाही हेच पोस्टर कसे दिसले, असा सवालही भाजपने केला.
पालकमंत्र्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने लावलेले अनधिकृत पोस्टर आजही उतरविण्यात आलेले नाहीत. त्याकडे महापालिकेच्या या विभागाचे लक्ष गेलेले नाही. परंतु, सत्तेची मगरुरी आलेल्या शिवसेनेला मात्र आम्ही लावलेलेच पोस्टर दिसले असून, महापालिकेनेदेखील ते उतरविण्यासाठी लगीनघाई केल्याने आश्चर्य वाटत असल्याची टीका भाजपचे गटनेते मनोहर डुंबरे यांनी केली आहे.