नशेसाठी वापरला जाणारा कफ सीरपचा साठा हस्तगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 12:16 AM2018-05-23T00:16:15+5:302018-05-23T00:16:15+5:30
पोलिसांनी ही कार थांबवून पाहणी केली असता, खाकी रंगाच्या एका बॉक्समध्ये आर. सी. कफ सीरपच्या १४४ बॉटल्स आढळल्या.
ठाणे : नशेसाठी वापरला जाणारा कफ सीरपचा साठा ठाणे पोलिसांनी सोमवारी रात्री हस्तगत केला. या प्रकरणी जोगेश्वरी येथील एका रहिवाशास अटक करण्यात आली.
ठाण्यातील वागळे इस्टेट येथील इटरनिटी मॉलजवळ एका कारमधून कफ सीरपचा साठा येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या घटक क्रमांक १ ला सोमवारी रात्री मिळाली. त्यानुसार, सहायक पोलीस निरीक्षक अविराज कुराडे आणि अन्न व औषध प्रशासन विभागाच्या औषध निरीक्षक शुभांगी भुजबळ यांच्या पथकाने सापळा रचला. रात्री ९ च्या सुमारास या पथकास पोपटी रंगाच्या एका कारवर संशय आला. पोलिसांनी ही कार थांबवून पाहणी केली असता, खाकी रंगाच्या एका बॉक्समध्ये आर. सी. कफ सीरपच्या १४४ बॉटल्स आढळल्या. हा साठा जोगेश्वरी येथील श्रवण चौधरी याच्या ताब्यात होता. पोलिसांनी विचारपूस केली असता, औषध बाळगण्याचा त्याच्याजवळ कोणताही अधिकृत परवाना नसल्याचे स्पष्ट झाले. नशेसाठी या औषधाची विक्री होत असून, आरोपीने त्यासाठीच हा साठा बेकायदेशीरपणे मिळविला असल्याचे स्पष्ट झाल्यावर पोलिसांनी त्याला अटक केली. औषध निरीक्षक शुभांगी भुजबळ यांच्या तक्रारीवरून वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीकडून औषधाचा साठा, मोबाइल फोन आणि औषधाच्या वाहतुकीसाठी वापरलेली कार असा ३ लाख १७ हजार ६८0 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.
बनावट औषधाचा संशय
आरोपीकडून हस्तगत केलेला कफ सीरपचा साठा सिप्ला कंपनीचा आहे. पाहणीत, सिप्ला कंपनीचे औषध आणि आरोपीजवळून हस्तगत केलेले औषध यामध्ये तफावत असल्याचे प्रथमदर्शनी आढळले. औषधाची पडताळणी करण्यासाठी जप्त औषधाचा नमुना सिप्ला कंपनीकडे पाठवणार आहे.