अंबरनाथमध्ये गाडी दरीत कोसळून अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:27 AM2021-06-11T04:27:26+5:302021-06-11T04:27:26+5:30
अंबरनाथ : घाटरस्त्यावर अचानक डोळ्यांवर प्रकाश आल्यामुळे गाडी दरीत कोसळल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. अंबरनाथच्या तीन झाड परिसरातील घाटात ...
अंबरनाथ : घाटरस्त्यावर अचानक डोळ्यांवर प्रकाश आल्यामुळे गाडी दरीत कोसळल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. अंबरनाथच्या तीन झाड परिसरातील घाटात बुधवारी (दि. ९) हा अपघात झाला. या अपघातात सुदैवाने कुणालाही इजा झाली नाही.
अंबरनाथ पश्चिमेच्या मोहन सबर्बिया संकुलात राहणारे नरसिमलू मेहेत्रे हे त्यांच्या वहिनीसोबत रात्री आठ वाजता अंबरनाथहून टिटवाळ्याच्या दिशेने जायला निघाले होते. यावेळी तीन झाड परिसरातील घाटात गाडी चालवीत असताना एका वळणावर अचानक समोरून आलेल्या गाडीचा प्रकाश मेहेत्रे यांच्या डोळ्यांवर पडला आणि समोरचे काहीच न दिसल्याने त्यांची गाडी थेट दरीत कोसळली. सुदैवाने ही गाडी उलटली नाही. त्यामुळे मेहेत्रे आणि त्यांच्या वहिनीला फारशी दुखापत झाली नाही. क्रेनच्या मदतीने खोल दरीतून ही गाडी उचलून वर काढण्यात आली. ज्या ठिकाणी हा अपघात घडला, त्या ठिकाणी पथदिवे लावण्यात आले असले तरी ते बंद असून, घाटाच्या कडेला कुठल्याही प्रकारचे रेलिंगही बसविण्यात आलेले नाही, अशी मेहेत्रे यांची तक्रार आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी गाडी चालविताना येथे अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे एखादा मोठा अपघात झाल्यानंतरच संबंधित यंत्रणांना जाग येणार का? असा प्रश्न या अपघातानंतर उपस्थित झाला आहे.