नवरदेवाच्या गाडीने ११ वऱ्हाड्यांना चिरडले, जखमींवर उपचार सुरू, चालकावर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2023 06:37 AM2023-05-10T06:37:03+5:302023-05-10T06:37:50+5:30

कॅम्प नंबर ३ विठ्ठलवाडी विद्याविहार उद्योग येथील प्रवीण हॉटेलच्या पार्किंगमध्ये नवरदेवाच्या गाडीने नाचणाऱ्या वऱ्हाड्यांना चिरडले.

car crushed 11 injured are being treated, driver charged with crime | नवरदेवाच्या गाडीने ११ वऱ्हाड्यांना चिरडले, जखमींवर उपचार सुरू, चालकावर गुन्हा

नवरदेवाच्या गाडीने ११ वऱ्हाड्यांना चिरडले, जखमींवर उपचार सुरू, चालकावर गुन्हा

googlenewsNext

उल्हासनगर : कॅम्प नंबर ३ विठ्ठलवाडी विद्याविहार उद्योग येथील प्रवीण हॉटेलच्या पार्किंगमध्ये नवरदेवाच्या गाडीने नाचणाऱ्या वऱ्हाड्यांना चिरडल्याने, लग्नाच्या ठिकाणी एकच धावपळ आणि खळबळ उडाली. जखमी ११ जणांना मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले असून मध्यवर्ती पोलिसांनी नवरदेवाची गाडी जप्त करून गाडीचालक रोहित रिजवान याला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला.

उल्हासनगरातील प्रवीण हॉटेलमध्ये विशाल सुरेश लुधवानी यांचे सोमवारी दुपारी लग्न होते. यावेळी बँडबाजाच्या तालावर नवरदेवाच्या वऱ्हाड्यांनी ठेका धरला होता. त्यांच्या मागे नवरदेव विशाल लुधवानी यांची कार रोहित रिझवान चालवत होता, मात्र अचानक रोहितचे गाडीवरील नियंत्रण सुटून गाडी नाचणाऱ्या वऱ्हाड्यांच्या अंगावर गेली. या प्रकाराने सर्वत्र आरडाओरड आणि रडण्याचे आवाज घुमू लागले. गाडीखाली चिरडून तब्बल ११ जण गंभीर जखमी झाले. नवरदेव विशाल याने स्वतः नातेवाइकांच्या मदतीने जखमींना मध्यवर्ती रुग्णालय आणि काहींना खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलविले. सर्वांची तब्येत धोक्याबाहेर असली, तरी अनेक जण गंभीर झाले आहेत.

नवरदेवाच्या गाडीने लग्नाच्या वऱ्हाड्यांना चिरडल्याची माहिती मध्यवर्ती पोलिसांना मिळाल्यावर, त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन नरवदेवाची गाडी ताब्यात घेतली. तसेच नवरदेवाची गाडी चालविणाऱ्या रोहित रिझवान याला ताब्यात घेऊन अटक केली. मध्यवर्ती पोलिस ठाण्यात रिझवान याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलिस तपास करीत आहेत.

Web Title: car crushed 11 injured are being treated, driver charged with crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात