राम मंदिरासाठी लग्नाच्या वऱ्हाडात शिरून केली होती कारसेवा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2020 02:38 AM2020-08-04T02:38:33+5:302020-08-04T02:39:31+5:30
शिवसैनिकाने जागवल्या आठवणी : मंदिर साकारतेय याचा आनंद
ठाणे : लग्नाच्या वºहाडाचा आसरा घेऊन सर्वप्रथम आम्ही १९८६ साली अयोध्येकडे रवाना झालो होतो. परंतु, १९९२ साली दुसऱ्यांदा गेलो, तेव्हा मात्र खुलेआम शिवसैनिक, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, भाजपचे कार्यकर्ते, सर्व रामभक्तांसोबत एकत्र गेलो होतो. त्यावेळी ‘जय श्रीराम’, ‘गर्व से कहो हम हिंदू है...’ अशा घोषणांनी आसमंत दणाणून सोडला होता. आज राम मंदिर प्रत्यक्षात आकारास येतेय, हे पाहून स्व. आनंद दिघे यांचे एक स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद होतोय.
राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी अयोध्यानगरी सज्ज झाली आहे, या कल्पनेनी ६६ वर्षीय शेडगे आनंदून गेले आहेत. ज्या राम मंदिराकरिता प्रचंड संघर्ष केला ते स्व. आनंद दिघे आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. अयोध्येला गेलेल्या काही लोकांवर झालेला अमानूष लाठीचार्ज मी जवळून पाहिला होता. दि. ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशिदीचा ढाचा पडला, त्याच्या दुसºया दिवशी कारसेवक म्हणून तेथे पोहोचलो. त्यात आठ जण मृत्युमुखी पडले होते, पण ते कोण होते, ते माहीत नाही. तेव्हा मात्र ‘जय श्रीराम’ अशा घोषणा दिल्या होत्या. ‘गर्व से कहो हम हिंदू है...’ या घोषणांच्या पट्ट्या बनविल्या होत्या. त्या टेंभीनाक्यावर बनविण्यात आल्या होत्या. तेव्हाही आम्ही तीन ते चार दिवस मुक्काम केला होता. आज राम मंदिर होतेय, हे पाहून खूप आनंद तर झालाच, पण दिघे यांचे स्वप्न पूर्ण होताना दिसतेय, याचा जास्त आनंद आहे.
- शब्दांकन : प्रज्ञा म्हात्रे
१९९२ साली राममंदिर उभारणीसाठी देशभर झालेल्या आंदोलनात ठाण्याचे नंदकुमार शेडगे सहभागी झाले होते. ते म्हणाले की, १९८६ साली मी रामभक्तांसोबत गेलो होतो, तेव्हा कडक बंदोबस्त होता. तुकड्यातुकड्यांमध्ये आम्ही गेलो होतो. त्यावेळी बंदी असल्याने लग्नाच्या वºहाडातून आम्हाला जावे लागले होते. कारसेवकांच्या आश्रमात तीन दिवस मुक्काम केला होता. जेवण नसल्याने आसपासचे गावकरी उकडलेले चणे आणून देत.