कार व्हीआयपी; तरी पोलिसांची थकबाकी, थकविला २३ कोटींचा दंड
By जितेंद्र कालेकर | Published: April 26, 2023 11:53 AM2023-04-26T11:53:56+5:302023-04-26T11:54:33+5:30
तीन महिन्यांत एक लाख वाहनचालकांनी थकविला २३ कोटींचा दंड
जितेंद्र कालेकर
ठाणे : ठाणे शहर पोलिस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात गेल्या तीन महिन्यांमध्ये एक लाख ९९ हजार ८६३ चालकांनी दंडाची २३ कोटी २४ लाख ५४ हजार ६५० इतकी रक्कम थकविली आहे. ही रक्कम भरण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. सिग्नल तोडण्यापासून ते अगदी सिटबेल्ट न लावण्यापर्यंत अशा अनेक वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन सर्रास केले जाते. यात मग अगदी व्हीआयपी क्रमांकाच्या कारही मागे नाहीत. गेल्या वर्षभरात २०२२ मध्ये एक लाख ७८ हजार ९३१ चालकांवर पोलिसांनी कारवाई केली. त्यातील सात लाख ७५ हजार २१५ चालकांची ५५ कोटींच्या घरात दंडाच्या थकबाकीची रक्कम होती.
दंड भरण्याचे आवाहन
दोन वर्षांपूर्वी ठाणे वाहतूक पोलिसांनी आवाहन केल्यानंतर ठाण्यातील अनेक सेलिब्रिटी आणि नेत्यांनीही त्यांच्या व्हीआयपी वाहनांवर असलेल्या दंडाची रक्कम स्वत:हून भरली होती. अजूनही काही व्हीआयपी मोटार कारच्या दंडाची रक्कम बाकी आहे.
१० हजारांपेक्षा जास्त दंड असल्यास जप्ती
वाहनधारकाने वाहतुकीचे नियम तोडू नये यासाठी गेल्या दोन वर्षांपासून नियम तोडणाऱ्यांच्या दंडाच्या रकमेमध्ये वाढ करण्यात आली आहे. १० हजारांपेक्षा जास्त दंड असल्यास तशी नोटीस बजावली जाते. प्रसंगी वाहन जप्तही केले जाते.
वाहतूक पोलिसांनी केली कारवाई
ठाणे आयुक्तालयातील ठाणे, भिवंडी, कल्याण आणि उल्हासनगर या विभागांमध्ये वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. गेल्या तीन महिन्यांमध्ये अनेकांनी दंडाची रक्कम थकविली. जानेवारी ते २४ एप्रिल २०२३ या चार महिन्यांमध्ये एक लाख ९९ हजार ८६३ चालकांकडे दंडाची २३ कोटी २४ लाख ५४ हजार ६५० थकबाकी आहे.
१२ कोटी ७० लाखांचा दंड वसूल
जानेवारी ते डिसेंबर २०२२ या वर्षभरात नियम मोडणाऱ्या नऊ लाख ७८ हजार ९३१ चालकांवर कारवाई झाली. यातून १२ कोटी ७० लाख ७६ हजार २०० इतका दंड वसूल झाला आहे.
नियमांचे उल्लंघन करून अपघाताबरोबरच दंड आणि पोलिस कारवाईला निमंत्रण देऊ नये. कारवाई झालीच, तर दंडाची रक्कमही भरावी. ती न भरल्यास न्यायालयामार्फत कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. - डॉ. विनय राठोड, पोलिस उपायुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा.