काेराेनामुळे डाेंबिवलीत चोरहंडीचा कार्यक्रम रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:43 AM2021-08-23T04:43:11+5:302021-08-23T04:43:11+5:30
डोंबिवली : मागील वर्षाप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सवावर कोरोनाचे सावट आहे. दहीहंडीच्या आधी गोविंदांचा सराव किती झाला आहे, याची चाचपणी ...
डोंबिवली : मागील वर्षाप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सवावर कोरोनाचे सावट आहे. दहीहंडीच्या आधी गोविंदांचा सराव किती झाला आहे, याची चाचपणी करण्यासाठी दरवर्षी नारळी पौर्णिमेला साजरा होणारा चोरहंडीचा कार्यक्रमही रद्द करावा लागला आहे. पश्चिमेतील महाराष्ट्र माझा सामाजिक संस्थेच्या वतीने रविवारी ठाकूरवाडीत सराव दहीहंडी (चोरहंडी) चा कार्यक्रम होणार होता. पण कोरोनात गोविंदा पथकांचा सराव न झाल्याने हा कार्यक्रम रद्द करावा लागला. दरम्यान, राज्य सरकार आणि मनपा यांच्याकडून दहीहंडी साजरी करायची की नाही, याबाबत कोणत्याही सूचना न दिल्याने गोविंद पथकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
गोकुळाष्टमीपूर्वी सर्व गोविंदा पथकांना एकत्रित बोलावून त्यांना मार्गदर्शन करण्याचे काम तसेच त्यांचा सराव किती झाला आहे, हे जाणून घेण्यासाठी चोरहंडीचे आयोजन केले जाते. मुंबईतील गोविंदा मंडळांकडून सुरू झालेली ही परंपरा डोंबिवलीतही दरवर्षी जोपासली जाते. डोंबिवली पश्चिमेतील महाराष्ट्र माझा सामाजिक संस्थेच्या वतीने चोरहंडीचा कार्यक्रम १२ वर्षे हा कार्यक्रम आयोजित करीत आहेत. यात कल्याण-डोंबिवलीतील अनेक गोविंदा पथके सहभागी होतात. गेल्या वर्षी कोरोनामुळे कार्यक्रम झाला नव्हता. यंदाही कोरोनाचे सावट जैसे थे राहिल्याने यंदाही तो रद्द करावा लागल्याची माहिती आयोजक हेमंत दाभोळकर यांनी दिली.
-----------------------------------
शहरात विविध राजकीय पक्षांकडून गोकुळाष्टमीला माेठमाेठ्या रकमेच्या दहीहंड्यांचे आयोजन केले जाते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही सूचना न आल्याने पथकांत संभ्रम आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे कितीही इच्छा असली तरी दहीहंडी खेळता येईल, असे वाटत नाही. त्यामुळे गोविंद पथकांत नाराजीचे वातावरण आहे. पण, कोरोनाचे संक्रमण वाढू नये या दृष्टिकोनातून विचार होणे हे गरजेचे आहे, असे मत दहीहंडी उत्सवाचे आयोजक तथा मनसेचे डोंबिवली शहर अध्यक्ष मनोज घरत यांनी व्यक्त केले. आम्हाला अजूनही दहीहंडी उत्सव साजरा करण्याबाबतच्या सूचना आलेल्या नाहीत. पथकांचा सरावही बंद आहे. राज्य सरकार स्पष्ट भूमिका मांडत नसल्याने पथकांमध्ये संभ्रमाचे वातावरण असल्याचे अष्टविनायक गोविंदा पथकाचे प्रमुख तथा मनपाचे माजी विरोधी पक्ष नेते प्रकाश भोईर म्हणाले.
------------------------------------------------------
फोटो आहे चोरहंडी कार्यक्रमाचा