कोरोनातही कुपोषित बालकांची घेतली गेली काळजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:24 AM2021-07-05T04:24:49+5:302021-07-05T04:24:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुरबाड : गेल्या वर्षापासून जगभरात कोरोना या महामारीने थैमान घातले आहे. मात्र, अशा परिस्थितीतही प्रशासकीय यंत्रणेच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुरबाड : गेल्या वर्षापासून जगभरात कोरोना या महामारीने थैमान घातले आहे. मात्र, अशा परिस्थितीतही प्रशासकीय यंत्रणेच्या सतर्कतेमुळे कुपोषित बालकांना प्रतिकारशक्तीचे बळ मिळाल्याने मुरबाड तालुक्यातील आदिवासीबांधवांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
कोरोना या महामारीला प्रतिकार करण्यासाठी सर्वच प्रशासकीय यंत्रणा सतर्क ठेवण्यात आल्या असतानाही अनेक नागरिकांचे बळी गेले. त्यामुळे एखाद्या घरातील कमावती व्यक्ती गेल्याने ते कुटुंब उद्ध्वस्त झाले. मात्र, या जीवघेण्या महामारीचे प्रमाण हे मुख्यतः शहरी भागात आहे. ग्रामीण भागातील कष्टकरी व आदिवासीबांधव हे शहरी भागापेक्षा अतिदुर्गम भागात वास्तव्य करीत असल्याने ते आपल्या पाल्याचे लग्न हे बालवयातच करतात. त्यांची प्रतिकारशक्तीही कमी असते. त्यामुळे त्यांच्या पोटी जन्माला येणाऱ्या बालकांमध्ये कुपोषणाचे प्रमाण हे अधिक असते. हे कुपोषणाचे प्रमाण कमी व्हावे व बालमृत्यूचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी शासन नेहमीच प्रयत्नशील असते. त्यामुळे मागील वर्षापासून जगभरात कोरोनाने थैमान घातले असले, तरी त्याचा या कुपोषित बालकांवर कोणत्याही प्रकारचा परिणाम होऊ नये म्हणून तालुका आरोग्य अधिकारी श्रीधर बनसोडे आणि बालविकास प्रकल्प अधिकारी ज्योती लघुटे, कल्पना देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथके तयार करण्यात आली होती. त्यांच्यामार्फत ज्या दुर्गम भागात संभाव्य कुपोषित तसेच कुपोषित बालके आहेत, त्यांना तसेच त्यांच्या पालकांना वेळोवेळी सकस आहार देऊन त्यांची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी विशेष काळजी घेण्यात आल्याने आदिवासीबांधवांना नवी संजीवनी मिळाली.
----------------------