उत्तनच्या मच्छीमार बोटीला मालवाहू जहाजाची धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2020 08:03 PM2020-09-03T20:03:14+5:302020-09-03T20:03:28+5:30
उत्तनच्या चौक येथील नाखवा डेनिस फ्रान्सिस मुनिस हे आपली 'अब्राहम' हि मासेमारी बोट घेऊन २८ ऑगस्ट रोजी मासेमारीला गेले होते
लोकमत न्यूज नेटवर्क
मीरारोड - भाईंदरच्या उत्तन येथून मासेमारीसाठी गेलेल्या अब्राहम बोटीला भर समुद्रात राजकोटहुन मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका मालवाहू जहाजाने धडक दिली. सुदैवाने यात जीवित हानी झाली नसली तरी बोटीचे नुकसान झाले आहे .
उत्तनच्या चौक येथील नाखवा डेनिस फ्रान्सिस मुनिस हे आपली 'अब्राहम' हि मासेमारी बोट घेऊन २८ ऑगस्ट रोजी मासेमारीला गेले होते . ३० ऑगस्ट रोजी ८० किलोमीटर खोल समुद्रात मासेमारी साठी कवीला बोट बांधून रात्रीचे जेवण आटोपून झोपून गेले . तर दोघे जण बोटीवर जागे होते . मध्यरात्रीच्या वेळी राजकोट वरून मुंबईच्या दिशेने जाणारे एक मालवाहू जहाज बोटीच्या दिशेने वेगात येताना त्या मच्छीमारांना दिसले .
त्यांनी प्रसंगावधान राखून कवीला बांधलेला बोटीचा दोरखंड कापुन बोट बाजूला घेण्याचा प्रयत्न केला. तो पर्यंत त्या जहाजाने बोटीच्या पुढील भागाला जबर धडक दिली. त्यात बोटीच्या नाळीला मोठी भेग पडली. बोट वेळीच बाजूला घेतली म्हणून मोठा अनर्थ टळला.
सदर बोट चौक धक्क्यावर आणण्यात आली असून बोटीच्या नाळीसह कवीचे सुमारे ३ ते ४ लाखांचे नुकसान झाले आहे . बोटीच्या दुरुस्ती कामा मुळे मासेमारीच्या हंगामास मुकावे लागणार असल्याचे नाखवा डेनिस यांनी सांगितले . याप्रकरणी डोंगरी - चौक मच्छिमार संस्थेने उत्तन सागरी पोलीस ठाण्यासह मुंबईच्या येलो गेट पोलीस ठाणे, राज्याच्या मत्स्यव्यवसाय विभागाचे आयुक्त, तटरक्षक दल आणि शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडे त्या मालवाहू जहाजाविरोधात तक्रार केली असून नुकसान भरपाई आणि कायदेशीर कारवाईची मागणी केली असल्याचे विल्यम गोविंद यांनी सांगितले .