एका डोळ्यात समाजाची, तर दुसऱ्यात कुटुंबाची काळजी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2021 12:20 AM2021-03-08T00:20:20+5:302021-03-08T00:20:46+5:30
कोरोना काळातही पत्करली जोखीम : संवेदनशील महिला आल्या रुग्णांच्या मदतीला धावून, जीवावर उदार होऊन केले काम
केवळ जागतिक महिलादिनीच महिलांचा सन्मान करण्याची मानसिकता बदलली पाहिजे. चूल आणि मूल यात अडकलेली महिला आज स्वतंत्र असून, ती स्वत:च्या पायावर उभी राहून घर सांभाळत आहे. प्रत्येक क्षेत्रात तिने ठसा उमटवला आहे. खासकरून कोरोनोच्या काळात अनेक डॉक्टर, परिचारिका, सामाजिक कार्यकर्त्या यांनी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम केले आहे. एकीकडे जीवावर उदार होऊन समाजासाठी काम करत असतानाच, दुसरीकडे त्यांच्या डोळ्यात कुटुंबाची काळजीही दिसत होती. जागतिक महिला दिनानिमित्त कोरोना काळात काम केलेल्या अशाच काही कोरोनायोद्धा महिलांचे अनुभवनकथन मांडण्याचा ‘लोकमत’ने केलेला हा प्रयत्न...
‘वॉर्डात जाताना युद्धाला जात असल्यासारखे वाटायचे’
अनेक रुग्ण आजारातून बरे झाल्याने मिळाले समाधान
ठाणे : कोरोनाच्या अगदी सुरुवातीच्या काळात खूप गोंधळ उडाला होता. कोरोनाच्या उपचाराविषयी सरकारकडून प्रशिक्षण देण्यात आले होते. परंतु कोरोना रुग्ण कसा असतो, हे कधीच पाहिले नव्हते. त्यामुळे गोंधळ आणि रुग्णाची काळजी यात मी अडकले होते. वरिष्ठांनी मनोधैर्य वाढविले, तसे या संकटाशी दोन हात करण्याची ऊर्जा मिळाली. कोरोना वॅार्डमध्ये जाताना एखाद्या युद्धाला जात असल्यासारखे वाटत होते. या युद्धाशी लढणारे आम्ही जणू सैनिक असून, हे युद्ध कोणत्याही परिस्थीतीत जिंकायचेच, अशा भावना मनात यायच्या. आपल्या हातून अनेक रुग्ण बरे होऊन सुखरूप घरी पोहोचले, याचे आज समाधान वाटते, अशी भावना सिव्हील रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डाॅ. वंदना पाटील यांनी व्यक्त केली.
डॉ. पाटील या कोरोना काळात आपल्या घरापासून तब्बल तीन महिने दूर होत्या. रुग्णालयात दाखल झालेल्या पहिल्या कोरोना रुग्णावर त्यांनी उपचार केले. रुग्ण सेवा हीच इश्वर सेवा या उक्तिला त्या खऱ्या उतरल्या. त्यांचे अनुभव सांगताना त्या म्हणाल्या, आम्ही एका कुटुंबासारखे काम करीत होतो. त्यामुळे एकमेकांचे सांत्वन करायचो. बाहेरच्या जगाचा विसर पडला होता. कॅलेण्डर तर माहीत नव्हते. वार, तारीख लक्षात राहात नसत. सण - उत्सव कधी आले, हे कळलेही नाही. डोळ्यांसमोर एकच ध्येय होते. ते म्हणजे या संकटातून समाजाला बाहेर काढायचे. त्यासाठी आम्ही सर्व डाॅक्टर, इतर सहकारी कर्मचारी जीवाभावाने, तहानभूक विसरुन परिश्रम घेतले, असे डाॅ. पाटील म्हणाल्या.