मेट्रो रेल्वेची कारशेड कोनमध्ये?बाजार समितीच्या विरोधामुळे झाला बदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 05:45 AM2018-01-11T05:45:42+5:302018-01-11T05:45:55+5:30
ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो रेल्वेची कारशेड कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात उभारण्यास बाजार समितीचा विरोध असल्याने त्यासाठी कोन गावानजीक असलेल्या जागेचा गांभीर्याने विचार सुरु आहे. मात्र त्यावर एमएमआरडीएचे अधिकारी बोलण्यास तयार नाहीत.
- मुरलीधर भवार
कल्याण : ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो रेल्वेची कारशेड कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात उभारण्यास बाजार समितीचा विरोध असल्याने त्यासाठी कोन गावानजीक असलेल्या जागेचा गांभीर्याने विचार सुरु आहे. मात्र त्यावर एमएमआरडीएचे अधिकारी बोलण्यास तयार नाहीत.
बाजार समितीच्या ठिकाणी मेट्रो रेल्वेचे शेवटचे स्थानक उभारले जाणार असल्याचे सांगण्यात आले. त्याठिकाणी जवळच मेट्रोची कारशेड उभारण्याचा प्रस्ताव आला. मात्र मेट्रोसाठी जागा देण्यास किंवा आपल्या जागेच्या डोक्यावर मेट्रोचे स्थानक उभारू देण्यास बाजार समितीने विरोध केला. तसे झाले तर बाजार समितीचा विकास खोळंबण्याचा धोका आहे. एमएमआरडीएने बाजार समितीच्या पदाधिकाºयांना चर्चेसाठी बोलावले. परंतु काहीच निष्पन्न झाले नाही. कारशेडला होणारा विरोध पाहता एमएमआरडीएने पर्यायी जागचा शोध सुरु केला. कोन गावात एक १५ एकर जागा असून तेथे मेट्रो कारशेड उभारता येईल का, याची चाचपणी सुरु आहे. परंतु अद्याप त्यावर शिक्कामोर्तब झाले नसल्याने त्याची माहिती देण्यास सूत्रांनी नकार दिला.
माहिती अधिकार कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर म्हणाले, सध्या अस्तित्वात असलेल्या भिवंडी-कल्याण- शीळ रोडच्या सहा पदरीकरणाच्या कामाला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. दुर्गाडी ते पत्री पूल या दरम्यान सहा पदरीकरणासाठी लगतच्या इमारतीवर हातोडा पडणार आहे. त्या मार्गावर एलिव्हेटेड मेट्रोे मार्ग टाकायचा ठरवला तरी त्यासाठी पोल कुठे व कसे उभे करणार हा प्रश्न आहे. मेट्रोचे नियोजन योग्य पद्धतीने होत नाही. एमएमआरडीए, राज्य रस्ते विकास महामंडळ व पालिकेत समन्वय नसल्याने कोट्यवधी रुपयांच्या प्रकल्पाचा बोजवारा उडू शकतो.
माजी शिवसेना नगरसेवक रवींद्र पाटील म्हणाले की, प्रस्तावित मेट्रो ही दुर्गाडी, सहजानंद चौक, शिवाजी चौक अशी न नेता. दुर्गाडी, खडकपाडा, बिर्ला रोड, भवानी चौक, सिंडीकेट आणि फुले चौकातून न्यावी, अशी मागणी २०१६ मध्ये या प्रकल्पास मान्यता मिळण्यापूर्वी केली होती. मागणी अगोदर केलेली असताना तिचा विचार न करता आता मेट्रोच्या मार्गाला मंजुरी मिळाल्याचे कारण एमएमआरडीएचे अधिकारी देत आहेत. पाटील यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर आपली नाराजी घातली आहे.
स्थानके जोडण्याचा प्रयत्न
- पालिकेने स्मार्ट सिटी अंतर्गत एरिया बेस डेव्हलपमेंटच्या कामाला प्राधान्य दिले आहे.
त्यात कल्याण रेल्वे स्थानक, कल्याण बस डेपो आणि मेट्रोचे बाजार समिती येथील स्थानक हे एकमेकांशी जोडण्याचे निश्चित केले आहे.
कल्याण सॅटीस प्रकल्पाचा वापर करून मेट्रो रेल्वे स्टेशनपर्यंत आणण्याची मागणी सुरू आहे. तसे झाल्यास मेट्रो आणि रेल्वे जोडली जाईल.