महाराष्ट्र शासनाचा निषेध केल्याप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाच्या १९ पदाधिकारऱ्यांवर गुन्हा
By सदानंद नाईक | Published: January 12, 2024 07:43 PM2024-01-12T19:43:37+5:302024-01-12T19:43:49+5:30
विधानसभा अध्यक्षानी दिलेल्या निर्णयाचा निषेध शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकार्यांनी केला.
उल्हासनगर: शिवसेना पक्षाबाबत विधानसभा अध्यक्षानी दिलेल्या निर्णयाचा निषेध शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकार्यांनी गुरवारी छत्रपती शिवाजी महाराज चौकात केला. या निषेधाची दखल मध्यवर्ती पोलिसांनी घेऊन निषेध करणाऱ्या १९ जणां विरोधात गुन्हे दाखल केले असून वैयक्तिक जमिनीवर त्यांची सुटका करण्यात आली.
उल्हासनगर कॅम्प नं-३ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी एकत्र येत विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी शिवसेना पक्षाबाबत दिलेल्या निर्णयाचा निषेध केला. दुसरीकडे नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयाचे शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकार्यांनी त्याच रात्री खासदार श्रीकांत शिंदे यांच्या संपर्क कार्यालया समोर फटाक्यांची आतिषबाजी करून पेढे वाटले. तर गुरवारी शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकार्यांनी कॅम्प नं-३ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र येत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना पक्षाबाबत नाराजी व्यक्त करून निर्णयाचा निषेध केला.
ठाकरे गटांनी नोंदविलेल्या निषेधाची दखल मध्यवर्ती पोलिसांनी घेऊन गुन्हा दाखल केला. तसेच वैयक्तिक जमिनीवर सुटका केली. आम्ही निषेध केल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मात्र रात्री शिंदे गटाने फटाक्यांची आतिषबाजी करून पेढे वाटले. या घटनेची दखल पोलिसांनी घेऊन गुन्हा का दाखल केला नाही. अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
शिवसेनेचे शहरप्रमुख पिंकी भुल्लर, उपशहरप्रमुख राजेंद्र शाहू, दिलीप मिश्रा यांच्यासह अन्य पदाधिकार्यांनी निषेध आंदोलनांत भाग घेतला. शनिवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा कल्याण लोकसभा निमित्त दौरा असून शहरात जुन्या जाणत्या पदाधिकार्यांनी भेट घेणार आहेत. तसेच जुन्या व निष्ठावंत शिवसैनिकात चैतन्य निर्माण झाले आहे.