भुयार खोदून बँक दरोडा प्रकरणात चौकशीसाठी पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2017 02:58 PM2017-11-17T14:58:25+5:302017-11-17T15:00:16+5:30
भुयार खोदून बँकेवर दरोडा घातल्या प्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी दोघांना ताब्यात घेतले आहे. बँक ऑफ बडोदावरील दरोडयाने सर्वांनाच चक्रावून टाकले आहे.
नवी मुंबई - भुयार खोदून बँकेवर दरोडा घातल्या प्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी दोघांना ताब्यात घेतले आहे. बँक ऑफ बडोदावरील दरोडयाने सर्वांनाच चक्रावून टाकले आहे. कारण दरोडयासाठी भुयार खोदून बँकेच्या आत शिरण्यासाठी रस्ता तयार करण्यात आला. भुयार खोदण्यासाठी वापरलेला गाळा व बँक यांमध्ये केवळ तीन गाळ्यांचे अंतर आहे. सोमवारी हा प्रकार उघड झाल्यानंतर सुमारे तीस फूट लांब भुयार पाहून सर्वांना धक्काच बसला होता.
जर बँकेला सुरक्षारक्षक असता तर हा प्रकार निदर्शनास आला असता आणि बँकेची लूट टळली असती. जर बँकेला रात्रीच्या वेळी सुरक्षारक्षक असता, तर त्यांच्या संशयास्पद हालचाली निदर्शनास आल्या असत्या. दरोडेखोरांनी भुयार खोदताना निघालेले डेब्रिज टाकले कुठे, असाही प्रश्न पोलिसांना पडला होता. अखेर भुयाराचे ते डेब्रिज घटनास्थळापासून सुमारे दीडशे मीटर अंतरावर नाल्यालगत टाकल्याचे आढळून आले आहे.
रात्रीच्या वेळी गोणीत भरून त्या ठिकाणी ते टाकले जायचे. या वेळी त्यांना आजूबाजूच्या कोणीच हटकले नाही. याबाबतदेखील शहरात आश्चर्य व्यक्त होत आहे. बँक ऑफ बडोदाला रात्री अथवा दिवसासाठी सुरक्षारक्षक नेमलेला नव्हता. केवळ एटीएम सेंटरच्या ठिकाणी फक्त दिवसापुरती एक वृद्ध व्यक्ती सुरक्षारक्षक म्हणून नेमलेली होती. रात्री कोणीही सुरक्षारक्षक नव्हता.
लॉकर फोडून ऐवज लुटून पळ काढण्यापूर्वी वापरलेला गाळा त्यांनी ओल्या फडक्याने पुसून काढल्याचे समजते. तर लॉकर तोडताना आवाज होऊ नये याकरिता स्क्रू ड्रायव्हरने ते उघडण्यात आल्याचेही सूत्रांकडून समजते. अन्यथा प्रत्येक लॉकरचे दोन्ही टाळे तोडण्यासाठी त्यांना अधिक वेळ लागला असता व ते जास्त लॉकर फोडू शकले नसते. एकंदर या घटनेचा तपास करणे हे पोलिसांपुढे आव्हान बनले आहे. तपासादरम्यान बँकेबाहेरील एका सीसीटीव्हीमध्ये तीन दरोडेखोर दिसून आले आहेत. मात्र कॅमेरापासून तोंड लपवण्याचा त्यांनी पुरेपूर प्रयत्न करून पोबारा केला
गेनाविरोधात पुरावा नाही
बँकेलगतचा गाळा मिळवण्यासाठी गेना प्रसाद नावाने भाडेकरार करण्यात आला होता. मात्र ही व्यक्ती गाळा ताब्यात घेतल्यानंतर तो सहका-यांच्या ताब्यात देऊन पसार झालेली आहे. भाडे करारावरील त्याच्या छायाचित्राशिवाय कसलाही ठोस पुरावा अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही.