बदलीपूर्वीच अडकल्या लाच प्रकरणात
By admin | Published: June 21, 2017 04:31 AM2017-06-21T04:31:34+5:302017-06-21T04:31:34+5:30
विजया जाधव यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या दोन महिन्यानंतरच त्यांनी उपविभागीय कार्यालयात भ्रष्टाचाराचा बाजार मांडला होता
पंकज पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बदलापूर : विजया जाधव यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या दोन महिन्यानंतरच त्यांनी उपविभागीय कार्यालयात भ्रष्टाचाराचा बाजार मांडला होता. उघड उघड पैसे मागून जमिनींच्या प्रकरणात न्याय देण्याचा धडाका त्यांनी लावला होता. या प्रकारामुळे अनेक तक्रारी आल्या होत्या. याच तक्रारींची दखल घेत आमदार किसन कथोरे यांनी महिनाभरापूर्वीच मुख्यंंत्र्यांना पत्र देऊन या भ्रष्ट्र अधिकाऱ्यांची बदलीची मागणी केली होती. या प्रकरणी निर्णय घेण्याची तयारी सरकार करत असतानाच लाचखोर जाधव या लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकल्या.
उल्हासनगरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडे उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि ग्रामीण भागाच्या कारभाराची जबाबदारी होती. या कार्यालयात मोठ्या प्रमाणात कामे चालतात ती जमिनीचे वाद मिटवण्याची. मात्र या वादांच्या प्रकरणातून आर्थिक लाभ मिळवण्याचा एक मोठा व्यवसाय उल्हासनगरच्या उपविभागीय कार्यालयात सुरू होता. शेती आणि शेतीच्या मालकी हक्कासंदर्भातील अनेक वाद या कार्यालयात चालवले जात होते. तहसीलदार यांनी दिलेल्या निर्णयांना आव्हान देण्यासाठी शेतकरी या कार्यालयात दाद मागत होते. या ठिकाणी न्याय बुध्दीने निर्णय घेणे हे उपविभागीय अधिकाऱ्यांची जबाबदारी होती. उपविभागीय अधिकाऱ्यांना न्यायाधीशाचे अधिकार प्राप्त होते.
शेत जमिनीचे प्रकरण निकाली काढत असताना न्यायदेवतेच्या भूमिकेत राहण्याची जबाबदारी ही उपविभागीय अधिकारी जाधव यांची होती. मात्र त्यांनी ९ महिन्यांपूर्वी पदभार स्वीकारल्यापासून या कार्यालयात निकाल देण्यासाठी आर्थिक लाभाचा मार्ग अवलंबला. त्यांच्या या कार्यशैलीची कल्पना आल्यावर या कार्यालयातील एका नायब तहसीलदारांनी रजेवर जाणे पसंत केले. या कार्यालयात काम न करण्याचा निर्णय नायब तहसीलदारांनी घेतला होता. त्यामुळे गैरहजर असलेल्या या नायब तहसीलदाराच्या कामाची जबाबदारी ही उल्हासनगरचे नायब तहसीलदार विकास पवार यांच्यावर सोपवण्यात आली होती. पवार आणि जाधव यांची चांगली समेट बसली होती.
पवार हे पूर्णपणे जाधव यांच्या आहारी गेल्याने त्या दोघांनी प्रकरणे बाहेर काढून संबंधितांशी आर्थिक व्यवहार करून न्याय देण्याचा सपाटा सुरू केला होता. या जोडीच्या कामाची आणि त्यांच्या भ्रष्टाचाराची मोठी चर्चा जागेचे व्यवहार करणाऱ्यांमध्ये होती. शेतकरी आणि बिल्डर यांच्यातील वादात बिल्डरच्या बाजूने निर्णय घेण्यासाठी मोठी रक्कम घेतली जात होती. या सर्व प्रकरणाची तक्रार अंबरनाथ तालुक्यातील शेतकऱ्यांनी कथोरे यांच्याकडे केली होती. या तक्रारीच्या आधारावर कथोरे यांनी लागलीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना पत्र पाठवत जाधव यांच्या भ्रष्ट कारभाराची तक्रार एक महिन्या आधीच केली होती. त्यांच्या या तक्रारीनंतर आपली बदली होण्याची शक्यता निर्माण झाल्याने जाधव या सतत मंत्रालयात खेटा मारत होत्या. त्यांनी आपली बदली रोखण्याचे सर्वेतोपरी प्रयत्नही केले होते. मात्र आमदार कथोरे यांनी त्यांच्या कार्यशैलीवर नाराजी व्यक्त करत चंद्रकांत पाटील यांची २० जून रोजी भेटही घेतली होती. त्यामुळे जाधव यांची बदली निश्चित मानली जात होती. मात्र विजया यांच्या चुकीच्या कामांचा उच्चांक गाठला गेल्याने त्यांची बदली नव्हे तर त्यांना त्यांच्या कामाची शिक्षाच वाट्याला आली. बदली होण्याची शक्यता ज्या दिवशी निर्माण झाली त्याच्या एक दिवस आधीच त्यांना लाचलुचपत विभागाने लाच घेताना अटक केली. त्यांना साथ देणारे नायब तहसीलदार पवार हेही जाळ्यात अडकले.