जमीन हस्तांतरण करून न देणाऱ्या विकासकावर नया नगर पोलीस ठाण्यात गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2022 07:10 PM2022-04-05T19:10:02+5:302022-04-05T19:10:07+5:30
मीन हस्तांतरण करून न देता रहिवाश्यांची फसवणूक केल्याने विकासकाविरुद्ध पोलीस ठाण्यात फिर्याद देऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
मीरारोड - इमारत बांधून त्यातील सदनिका आदींची विक्री करून मोकळ्या झालेल्या विकासकाने रहिवाश्याना मात्र जमिनीचे हस्तांतरण करून न दिल्या प्रकरणी मीरारोडच्या नया नगर पोलीस ठाण्यात विकासका विरुद्ध मोफा कायद्या खाली गुन्हा दाखल झाला आहे.
वनिता वसंत शेट्टी (५४) रा . ,सागर प्लाझा गृहनिर्माण संस्था , होली क्रस हायस्कुलचे मागे, मीरारोड यांच्या फिर्यादीवरून सोमवार ४ एप्रिल रोजी विकासक सागर कंस्ट्रक्शन विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे . फिर्यादी शेट्टी ह्या सदर गृह संस्थेच्या सचिव आहेत . तर जली फ्रान्सीस हे अध्यक्ष आहेत. सदर इमारतीत ए व बि विंग असुन त्यामध्ये एकूण ३२ सदनिका व २ दुकाने आहेत . सदर इमारतीस पालिके कडून भोगवटा दाखला मिळाला असून १९९७ साली गृहनिर्माण संस्थेची नोंदणी झालेली आहे .
परंतु इमारतीची जमीन मात्र गृहनिर्माण संस्थेच्या नावे विकासकाने करून दिलेली नसल्याने सागर कंस्ट्रक्शन कंपनी कडे सतत पत्रव्यवहार केला . परंतु विकासकाचे कार्यालयच बंद असल्याचे समजल्याने अखेर जमीन हस्तांतरण करून न देता रहिवाश्यांची फसवणूक केल्याने विकासका विरुद्ध पोलीस ठाण्यात फिर्याद देऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे .