ठाण्यातील पोलीस भरतीमध्ये गैरप्रकार करणाऱ्या पाच परीक्षार्थीविरुद्ध गुन्हा दाखल
By जितेंद्र कालेकर | Published: September 27, 2021 12:54 AM2021-09-27T00:54:05+5:302021-09-27T00:57:00+5:30
ठाण्यातील पोलीस भरतीमध्ये गैरप्रकार करणाºया देवेंद्र बोरसे (२८, रा. कावठे, साक्री, जि. धुळे) याच्यासह पाच परीक्षार्थीविरुद्ध कलम ४१९ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.
जितेंद्र कालेकर
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाण्यातील पोलीस भरतीमध्ये गैरप्रकार करणाºया देवेंद्र बोरसे (२८, रा. कावठे, साक्री, जि. धुळे) याच्यासह पाच परीक्षार्थीविरुद्ध कलम ४१९ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. ठाण्यातील कापूरबावडी पोलिसांनी रविवारी रात्री याप्रकरणी याबाबतची फिर्याद दाखल केली आहे.
ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनेवर चालक पदासाठी रविवारी, २६ सप्टेंबर रोजी भरती प्रक्रीया झाली. त्यासाठी ठाणे शहर आणि वागळे इस्टेट या दोन परिमंडळातील ४९ केंद्रावरील शाळा तसेच महाविद्यालयांमध्ये उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात आली. तब्बल ११ हजार ३८ उमेदवारांनी ही परीक्षा दिली. दरम्यान, दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास बाळकुम येथील विद्या प्रसारक विद्यालयाच्या केंद्र क्रमांक २१ मधील कक्ष क्रमांक पाच मधील देवेंद्र बोरसे (२८), बापू गावडे (४०, रा. बारामती, जि. पुणे), प्रफुल्ल मंडाले (२५, रा. सिंहगड रोड, जि. पुणे), मनोज पिंपरे (२४, रा. देऊळवाडी, ता. उदगीर, जि. लातूर) आणि अनिकेत पाटील (२५, रा. भडगाव, जि. जळगाव) यांनी पोलीस शिपाई चालक भरती परीक्षेचे नियम, अटी माहिती असतांनाही त्याचे उल्लंघन केले. त्यांनी एकमेकांना फायदा होण्यासाठी आपसात संगनमत करुन प्रश्नपत्रिकेवर उत्तरांच्या खुणा करुन ही प्रश्नपत्रिका आपआपसात आदलाबदल करुन तोतयेगिरी करीत शासनाची फसवणूक केल्याचे निदर्शनास आले. हा प्रकार उघड झाल्यानंतर त्याठिकाणी बंदोबस्तासाठी असलेले निजामपुरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अतुल लंबे यांनी शासनातर्फे कापूरबावडी पोलीस ठाण्यात या पाचही जणांविरुद्ध रविवारी रात्री गुन्हा दाखल केला. सहायक पोलीस निरीक्षक व्ही. व्ही. मोसमकर हे अधिक तपास करीत आहेत.