मीरा रोडमध्ये गुडविन ज्वेलर्सविरोधात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2019 01:22 AM2019-11-04T01:22:18+5:302019-11-04T01:22:42+5:30
१३१ ग्राहकांची तक्रार : अडीच कोटींहून अधिक फसवणूक; आकडा आणखी वाढण्याची शक्यता
मीरा रोड : बेकायदा योजनांमार्फत प्रलोभन दाखवून मीरा रोडमध्ये गुडविन ज्वेर्ल्सच्या योजनेत गुंतवणूक केलेल्या १३१ ग्राहकांची दोन कोटी ६७ लाख ७६ हजार रुपयांना फसवणूक केल्याप्रकरणी रविवारी नयानगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तर फसवणूक झालेल्यांची संख्या वाढून फसवणुकीची रक्कमही दुपटीने वाढून पाच कोटींपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
मीरा रोड येथील अयप्पा मंदिराजवळील शांती विहार इमारतीत गुडविन ज्वेलर्सची शाखा २०१७ पासून सुरू करण्यात आली होती. यामध्येही गुडविनच्या फसव्या योजनांना लोकभुलले. दरमहा हप्ता प्रमाणे १२ हप्ते भरल्यावर तेरावा हप्ता गुडविन ज्वेलर्सकडून भरला जाऊन दागिने खरेदी करण्याचे वा वार्षिक व्याजाचे प्रलोभन आदी योजनांद्वारे ग्राहकांना दिले गेले. गुडविनचे नाव झाले असल्याने लोकांनी मोठ्या संख्येने त्यांच्या योजनांमध्ये गुंतवणूक सुरू केली. पण लोकांना आश्वासनांप्रमाणे केलेल्या गुंतवणुकीवर मोबदला मिळण्यास चालढकल सुरू झाली.
१५ आॅक्टोबरपासून तर दुकानच बंद झाले. त्यामुळे ग्राहकांनी तक्रारी नयानगर पोलीस ठाण्यात येऊन देण्यास सुरुवात केली होती. फसवणुकीप्रकरणी मोठ्या संख्येने ग्राहकांचे अर्ज येत आहेत. पोलिसांनी ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांना याची माहिती दिली.
रविवारी पोलिसांनी याप्रकरणी जोसेफ ऐरॉली फर्नांडिस (६५ ) तसेच अन्य १३० जणांच्या फिर्यादीनुसार गुडविन ज्वेलर्सचे चालक -मालक सुनीलकुमार नायर आणि सुधीरकुमार नायर, व्यवस्थापक सुब्रमण्यम मेनन व अन्य आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
दुकानाच्या झडतीत काहीच आढळले नाही
पोलीस निरीक्षक कैलास बर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपास सुरू केला आहे. दुकानाची झडती घेतली असता दुकान पूर्णपणे रिकामी असल्याचे आढळून आले. तर शांतीनगरमध्ये राहत असलेला आरोपी मेनन याच्या घरी पोलीस गेले असता घर बंद होते. फसवणूक झालेल्या ग्राहकांच्या तक्रारी वाढतच असून फसवणुकीची रक्कम पाच कोटींच्या घरात जाण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.