वेठबिगारीत अडकविण्याऱ्या दोघा सावकारांविरोधात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:26 AM2021-09-02T05:26:46+5:302021-09-02T05:26:46+5:30
नितीन पंडित भिवंडी - भिवंडीतील पिळंझे चिंचपाडा येथील आदिवासी बांधवांवर येथील सावकारांकडून होणाऱ्या अन्यायाची दाहकता लोकमतने सर्वांसमोर आणली. वर्षानुवर्षे ...
नितीन पंडित
भिवंडी - भिवंडीतील पिळंझे चिंचपाडा येथील आदिवासी बांधवांवर येथील सावकारांकडून होणाऱ्या अन्यायाची दाहकता लोकमतने सर्वांसमोर आणली. वर्षानुवर्षे सावकाराच्या वेठबिगारीत अडकलेल्या आदिवासी बांधवांना लोकमतने धीर देत त्यांना अन्यायाविरोधात बोलते केले. त्यानंतर मागील अनेक वर्षांपासून आपल्यावर सावकारांनी केलेल्या अन्यायाची आपबीती पोलिसांसमोर सांगितली असता अन्याय करणाऱ्या दोघा सावकारांवर गणेशपुरी पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याबरोबरच बंधबिगारी उच्चटन अधिनियम कलमांतर्गत गणेशपुरी पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजाराम काथोड पाटील व चंद्रकांत काथोड पाटील (रा.पिळंझे चिंचपाडा) अशी आदिवासींना वेठबिगारीत अडकवून त्यांच्यावर अन्याय, अत्याचार करणाऱ्या आरोपी सावकारांची नावे आहेत. पिळंझे चिंचपाडा येथील आदिवासी बांधवांना मागील २५ ते ३५ वर्षांहून अधिक काळ आपल्याकडे वेठबिगारी मजूर म्हणून त्यांनी अडकवून ठेवले होते. पती-पत्नी अशा दोघांना आठवड्याला केवळ पाचशे रुपये मजुरीवर हे सावकार राबवून घेत होते. त्याचबरोबर मजुरांना मारझोड तर महिलांवर अत्याचारही या सावकारांनी केल्याचे वास्तव लोकमतने मांडले. अन्यायाविरोधात बोलण्यास भाग पाडल्यानंतर येथील आदिवासी मजूर संजय गोपाळ वाघे यांनी आपल्यावर सन १९९५ पासून म्हणजे सुमारे २६ वर्षांपासूनचा होणार अन्याय पोलिसांसमोर कथन केला. संजय वाघे यांच्याबरोबरच आदिवासी पाड्यातील सुमारे २५ ते ३० हून अधिक आदिवासी बांधवांची छळवणूक केल्याची माहिती संजय वाघे यांनी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत नमूद केली आहे.
राजाराम पाटील व चंद्रकांत पाटील या दोघांकडे संजय वाघे हा मजुरी करत होता. खदाणीत काम करताना दगड संजय याच्या डोळ्याला लागल्याने त्याच्या डोळ्याला जखम झाली होती. मजूर संजय याने सावकारांकडे डोळ्याच्या उपचारासाठी पैसे मागितले. मात्र, त्यांना शिवीगाळ करून हाकलून दिल्याने संजय याचा डोळा कायमचा निकामी झाला. त्यानंतर इतर ठिकाणी मजुरीला गेले, तर दोघे सावकार त्यांना मारहाण करत होते. ही बाब सर्वात आधी संजय याने लोकमतकडे मांडली होती. श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी देखील या मजुरांना मोठे पाठबळ दिले आहे. त्यानंतर मंगळवारी वाघे यांनी २६ वर्षांतील घटना गणेशपुरी पोलिसांकडे मांडल्यानंतर गणेशपुरी पोलीस ठाण्यात पिळंझे येथील कथित सावकार म्हणून वावरणारे राजाराम व चंद्रकांत पाटील या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपअधीक्षक दिलीप गोडबोले करीत आहेत. विशेष म्हणजे श्रमजीवी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस बाळाराम भोईर यांनी लोकमतचे आभार मानले.