मराठी माणसांना 'नो- एन्ट्री' म्हणणाऱ्या घर मालकासह दोघांवर गुन्हा दाखल; मीरारोडमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2021 09:17 PM2021-10-10T21:17:51+5:302021-10-10T21:18:04+5:30
मराठी एकीकरण समितीचे गोवर्धन देशमुख यांना फेसबुकवर रिंकू संगोई देढिया यांनी त्यांचा मीरारोडच्या शांती नगरमधील फ्लॅट विकायचा आहे म्हणून टाकलेली पोस्ट वाचनात आली होती.
मीरारोड - मराठी माणसांना घर न विकण्याचा सोसायटीचा नियम असे सांगत मराठी माणसाला घर विक्री करण्यास नकार देणाऱ्या दोघांवर मीरारोडच्या नया नगर पोलीस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मराठी एकीकरण समितीचे गोवर्धन देशमुख यांना फेसबुकवर रिंकू संगोई देढिया यांनी त्यांचा मीरारोडच्या शांती नगरमधील फ्लॅट विकायचा आहे म्हणून टाकलेली पोस्ट वाचनात आली होती. देढिया यांनी त्यांच्या पोस्ट मध्ये फ्लॅट फक्त गुजराती, मारवाडी आणि जैन समाजाच्या लोकांना विकणार असल्याचे लिहिले होते.
देशमुख यांनी फेसबुकवर दिलेल्या त्या पोस्ट मधील भ्रमणध्वनी वर संपर्क साधला असता त्याने स्वतःचे नाव राहुल देढिया असल्याचे सांगितले. देशमुख यांनी मला तुमचा फ्लॅट विकत घ्यायचा आहे असे सांगितले असता देढिया याने आमच्या सोसायटीत मराठी, ख्रिश्चन, मुस्लिम आदीं लोकांना फ्लॅट विकत नाहीत. तसा सोसायटीचा नियम आहे. सोसायटीत फक्त मारवाडी, गुजराती व जैन लोकांनाच फ्लॅट विकला जातो. तुम्हाला वा मराठी माणसाला विकता येणार नाही असे राहुल याने सांगितले.
या प्रकरणी देशमुख सह मराठी एकीकरण समितीचे प्रदीप सामंत यांनी पोलिसात तक्रार करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. अखेर रविवारी १० ऑक्टोबर रोजी नयानगर पोलिसांनी देशमुख यांच्या फिर्यादी नुसार रिंकू संगोई देढिया आणि राहुल देढिया या दोघांवर भारतीय दंड संहिता १५३ (अ) नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांवर सुद्धा गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.