आव्हाडांच्या अडचणीत वाढ; वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
By अजित मांडके | Published: January 11, 2024 12:17 PM2024-01-11T12:17:29+5:302024-01-11T12:18:42+5:30
प्रभू श्रीराम मांसाहारी होते हे वादग्रस्त विधान.
अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : शिर्डी येथे राष्ट्रवादी शरद पवार गटाने विशेष अधिवेशन पार पडले. त्यावेळी आमदार जितेंद्र आव्हाडांनी प्रभू श्रीराम हे मांसाहारी होते. असे वादग्रस्त विधान केले. आमदार आव्हाडांनी हिंदू बांधव समाजाचा धार्मिक भावना दुखावण्याचे उद्देशाने वरील वादग्रस्त विधान केल्याची तक्रार भाजप प्रदेश उद्योग आघाडी महिलाध्यक्ष सेजल कदम यांनी केली होती. त्या तक्रारीवरून आव्हाड यांच्यावर वर्तकनगर पोलीस ठाण्यात कलम २९५ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे आव्हाड यांच्या अडचणीत भर पडण्याची शक्यता अधिक आहे. यापूर्वी आव्हाड यांच्यावर वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
राष्ट्रवादीच्या विशेष अधिवेशनात आव्हाडांनी प्रभू श्रीराम शाहाकारी नव्हते तर ते मांसाहारी होते असे वादग्रस्त विधान केले. त्यानंतर आव्हाडांविरोधात तीव्र नाराजी उमटण्यास सुरुवात झाली. यामध्ये राजकीय संघटना नाही तर धार्मिक संघटनांनी त्या वादग्रस्त विधानाबाबत आव्हाडांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी पुढे आली. यासाठी पोलीस ठाण्यात संघटनांनी धावही घेतली होती.
वादग्रस्त विधानानंतर ठाण्यातील आव्हाड यांच्या बंगल्याबाहेर राष्ट्रवादी अजित पवार गटाने निषेधार्थ आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी वेळीच धाव घेत त्या आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. याच्यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार गटाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी गुन्हा दाखल करा अशी मागणी केली. अन्यथा पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून महाआरती करण्याचा इशारा दिला. अशाप्रकारे भाजपच्या महिलांनी आंदोलन केले. याचदरम्यान भाजप उद्योग आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी धाव घेत, गुन्हा दाखल करण्यासाठी निवेदन दिले. त्यानुसार आव्हाड यांच्यावर वर्तकनगर पोलीस ठाण्यात कलम २९५ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
होऊ शकतो तीन वर्षांचा तुरुंगवास
कायद्यानुसार जर एखादी व्यक्तीने बोलून किंवा लिखीत स्वरूपात किंवा चिंन्हांद्वारे कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या. तर भारतीय दंड विधानाच्या कलम २९५ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येतो. तसेच त्याला तीन वर्षाचा तुरुंगवास किंवा दंड किंवा दोन्ही, अशा शिक्षेची तरतूद कायदा आहे.