विकासकाकडून खंडणी मागीतल्या प्रकरणी नगरसेवक मतलूब सरदार यांस अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 01:39 AM2019-02-23T01:39:58+5:302019-02-23T01:48:14+5:30
भिवंडी : महानगरपालिकेतील काँग्रेसचे सभागृह नेता मतलुब अफजल सरदार यांना चार लाखांच्या खंडणी प्रकरणी शांतीनगर पोलीसांनी शुक्रवारी रात्री उशीरा ...
भिवंडी: महानगरपालिकेतील काँग्रेसचे सभागृह नेता मतलुब अफजल सरदार यांना चार लाखांच्या खंडणी प्रकरणी शांतीनगर पोलीसांनी शुक्रवारी रात्री उशीरा अटक केली आहे. या घटनेने शहरात खळबळ माजली आहे .
शांतीनगर पिराणीपाडा येथे नुरी अपार्टमेंट या इमारतीचे अनाधिकृत बांधकाम सुरू होते. नगरसेवक मतलूब अफजल सरदार याने सदरची इमारत अधिकृत करण्यासाठी विकासक सलीम अब्दूल हाफिज अन्सारी याच्याकडे पाच लाख रूपयांची मागणी केली. पैश्यासाठी नगरसेवक मतलूब सरदार याने तगादा लावल्याने विकासक सलीम याने चार लाख रूपये देण्याचे कबूल केले. तसेच ही रक्कम कोणाकडे द्यावयाची असे विचारले असता मतलूब सरदार याने रणखांब यांना द्यायचे असल्याचे सांगीतले.या सर्व वार्तालापाची आॅडीओ क्लिप घेऊन विकासक सलीमने शांतीनगर पोलीस ठाणे गाठले आणि आॅडीओ क्लिपचा पुरावा सादर करीत शांतीनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानुसार पोलीसांनी नगरसेवक मतलूब सरदार यांस अटक केली आहे. मतलूब सरदार गेल्या वीस वर्षापासून पिराणीपाडा या भागातून काँग्रेसचे नगरसेवक म्हणून निवडून येत आहेत. गेल्या महिन्यात त्यांची महानगरपालिकेत काँग्रेसचे सभागृह नेता म्हणून नियुक्ती झाली आहे. महानगर पालिकेत अशोक रणखांब हे अतिरिक्त आयुक्त म्हणून काम पहात आहेत. पोलीसांना दाखल केलेल्या आॅडीओमध्ये रणखांब असा उल्लेख असल्याने शहरात विविद तर्कवितर्क केले जात आहे. पोलीसांनी त्यास अटक करून त्याची रात्री सबजेल मध्ये रवानगी केली आहे. या घटनेने काँग्रेसच्या गोटात व पालिका वर्तुळात खळबळ माजली आहे.