पदाचा गैरवापर करून खोटा गुन्हा दाखल करणाऱ्या ठामपाच्या अधिकाऱ्यांसह ५ जणांवर गुन्हा दाखल
By अजित मांडके | Published: July 6, 2024 03:34 PM2024-07-06T15:34:33+5:302024-07-06T15:34:44+5:30
ठाणे न्यायालयाने दिलेल्या आदेशान्वये ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) शुक्रवारी ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला
ठाणे : ठाणे महापालिकेच्या ०३ अधिकाºयांसह २ कर्मचाºयांनी त्यांच्या पदाचा गैरवापर करून तक्रारदार यांच्याविरूध्द खोटा गुन्हा दाखल केला असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी ठाणे न्यायालयाने दिलेल्या आदेशान्वये ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) शुक्रवारी ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी ठामपा तत्कालीन सचिव मनिष जोशी, कळवा प्रभाग समितीचे प्रभाग अधिकारी सुरेश राजपूत, कनिष्ठ अभियंता रविंद्र कासार, ठामपा मुख्य प्रशासकीय कार्यालयातील बाळू पिचड आणि उथळसर प्रभाग समितीमधील कर्मचारी गगनसिंग दानसिंग थापा अशा ५ जणांविरोधात हा गुन्हा दाखल झाला आहे. तक्रारदार यांनी केलेल्या तक्रारी अर्जात वरील ०३ अधिकारी व कर्मचाºयांनी स्वत:च्या आर्थिक फायदाकरीता कायदयामधील तरतूदींची जाणीवपुर्वक व हेतुपुरस्सर अवज्ञा करून खोटे, बनावट आणि चुकीचे दस्ताऐवज तयार केले. तसेच ते दस्ताऐवज खोटे, बनावट आणि चुकीचे असल्याचे माहित असून देखील खरे म्हणून वापरून चुकीच्या अभिलेखाची मांडणी केली व शासकीय अभिलेखात खोट्या नोंदी केल्या. तसेच, ते खोटे, बनावट आणि चुकीचे दस्तऐवज समान उद्देश साध्य करण्याकरीता संगनमताने कट रचून न्यायालयीन अभिलेखात पुराव्याकामी दाखल करुन कायद्याने माहिती देणे बंधनकारक असताना सुध्दा जाणीवपूर्वक खोटी माहिती दिली. याशिवाय तक्रारदारांना नुकसान पोहचवण्याच्या दृष्टीने आणि तक्रारदारांना खोटया गुन्हयात अडकविण्याच्या गैर उद्देशाने त्यांना कोणत्याही प्रकाराचे अधिकार नसतांना स्वत:च्या आर्थिक फायदाकरीता, पदाचा दुरुपयोग करून तक्रारदार यांचेविरूध्द खोटे पुरावे तयार केले व खोटी फिर्याद दाखल करून ठामपा अधिकारी व कर्मचाºयांनी गुन्हेगारी गैरवर्तन केले. त्यानुसार त्या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती ठाणे एसीबीने दिली. याप्रकरणी ठाणे एसीबीने अधीक्षक सुनील लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजय कवळे पुढील तपास करत आहेत.
प्रकरण १० वर्षापूर्वीचे
दाखल केलेल्या गुन्हयाचे प्रकरण दहा वर्षांपुवीर्चे आहे. या गुन्ह्यातील तक्रारदाराने राहत्या इमारतीत वाढीव बेकायदा बांधकाम केले होते. त्याला इमारतीमधील रहिवाशांनी विरोध केला होता. तसेच याप्रकरणी त्यांनी पालिकेच्या उथळसर प्रभाग समितीकडे तक्रार केली होती. या तक्रारीच्या आधारे तक्रारदाराला नोटीस देऊन याबाबत स्पष्टीकरण देण्यास सांगितले होते. परंतु उत्तर देत नसल्यामुळे त्याच्यावर एमआरटीपीची कारवाई केली होती. दरम्यान दाखल केलेल्या गुन्ह्या विरोधात आम्ही उच्च न्यायलयात धाव घेतली होती. या संदर्भात पालिकेने चौकशी केली होती. त्यात आम्ही निर्दोष आढळून आलो होते. त्याचा अहवाल पालिकेने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिला होता. तक्रारदाराने न्यायालयाची दिशाभुल केल्याने हा गुन्हा दाखल झाला आहे. हा गुन्हा रद्द व्हावा यासाठी आम्ही उच्च न्यायालयात धाव घेणार आहोत, अशी माहिती उपायुक्त मनिष जोशी यांनी दिली.