मनसेच्या अविनाश जाधव यांच्यावर गुन्हा दाखल; ठाकरेंवरील हल्ल्याची फित केली व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2024 07:04 AM2024-08-13T07:04:13+5:302024-08-13T07:04:34+5:30
जाधव यांच्यासह नऊ जणांविरुद्ध तक्रारीनंतर नाैपाडा पाेलिस ठाण्यात गुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: ठाण्यात भगवा सप्ताह कार्यक्रमात मार्गदर्शनासाठी आलेले माजी मुख्यमंत्री तथा उद्धवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे हे आले असताना त्यांच्या वाहनावर मनसेच्या ठाणे, पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्यासह इतरांनी हल्ला केला होता. याचेच समर्थन करण्यासाठी साेशल मीडियाद्वारे घटनेचा लाइव्ह व्हिडीओ केल्याप्रकरणी जाधव यांच्यासह नऊ जणांविरुद्ध शिवसेनेच्या वागळे इस्टेट विभागप्रमुख प्रतीक राणे यांच्या तक्रारीनंतर नाैपाडा पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
ठाकरे १० ऑगस्टला गडकरी रंगायतन येथे कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी त्यांच्याविरुद्ध मनसेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. त्यांच्या वाहनावर हल्ला केल्याचा एक गुन्हा जाधव यांच्यासह ३५ जणांविरुद्ध नौपाडा पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. तसेच फेसबुकवर लाइव्ह व्हिडीओद्वारे हल्ल्याचे समर्थन केले.
हल्ल्याचा कट रचल्याचा आरोप
यावेळी नितीन कंपनी जंक्शन येथून ठाणे पालिकेकडे जाणाऱ्या अल्मेडा रोडवर ठाकरे यांच्या वाहनांच्या ताफ्यावर नारळ फेकून हल्ल्याचा पूर्व नियोजित कट रचून, त्यास जाधव यांनी प्रोत्साहन देत जमाव एकत्र केला. याच जमावाने त्यांच्या वाहनावर नारळ फेकून वाहनाचे नुकसान केले. हा संपूर्ण प्रकार चित्रित करून तो लाइव्ह दाखवून या घटनेचे समर्थन केल्याने राणे यांनी अविनाश जाधव, प्रीतेश मोरे, आकाश पवार, अरुण जेटलू आणि मनोज चव्हाण आणि इतर चार अशा नऊजणांवर याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ६१ नुसार गुन्हा दाखल झाला आहे.