मीरा भार्इंदर मध्ये ३०० आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2018 08:00 PM2018-01-04T20:00:47+5:302018-01-04T20:01:13+5:30
कोरेगाव - भीमा घटनेप्रकरणी भारीपसह विविध संघटनांनी पुकारलेल्या बंद दिवशी रेल व रास्ता रोकोसह बळजबरी दुकानं बंद करायला लावणा-या सुमारे ३०० पेक्षा जास्त आंदोलकांवर नवघर, रेल्वे व काशिमीरा पोलीसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
मीरारोड - कोरेगाव - भीमा घटनेप्रकरणी भारीपसह विविध संघटनांनी पुकारलेल्या बंद दिवशी रेल व रास्ता रोकोसह बळजबरी दुकानं बंद करायला लावणा-या सुमारे ३०० पेक्षा जास्त आंदोलकांवर नवघर, रेल्वे व काशिमीरा पोलीसांनी गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये शिवसेना नगरसेवकाचा देखील समावेश आहे.
बुधवारी सकाळपासून मीरा भार्इंदरमध्ये भारीपसह आरपीआयचे विविध गट व संघटनांनी जमावबंदीचा आदेश मोडून शहरात बेकायदा रॅली काढल्या होत्या. रॅली काढताना रिक्षा, दुकानं बंद करायला लावली. तसेच भाईंदर रेल्वे स्थानकात फलाट क्र. १ व ४ च्या रेल्वे रुळावर उतरुन लोकल अडवल्या. याशिवाय सावरकर चौक, शिवार उद्यान नाका, काशिमीरा नाका, वरसावे नाका आदि ठिकाणी रास्ता रोको केला होता. वरसावे येथे टायर जाळण्यात आला होता.
रेल रोको प्रकरणी वसई रेल्वे पोलीस ठाण्यात ७५ ते १०० आंदोलकां विरुध्द गुन्हा दाखल झालाय. तर नवघर पोलीसांनी सावरकर चौकात रास्ता रोको व भार्इंदर पुर्व भागात रॅली काढल्या प्रकरणी ४८ आंदोलकांच्या नावां सह अन्य १२५ ते १५० लोकांच्या जमावा विरुध्द गुन्हा दाखल केलाय. या मध्ये शिवसेना नगरसेवक अनंत शिर्के सह सुनिल भगत, उत्तम नाईक, अनिल भगत, फारुक कुरेशी, अमिता दारशेकर, त्रिशला ढाले, सुनिल शर्मा आदींचा समावेश आहे.
तर काशिमीरा पोलीसांनी पेणकर पाडा येथे बळजबरी दुकानं बंद करायला लावणारया ११ जणां विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.