लैंगिक अत्याचारप्रकरणी सावत्र पित्यापाठोपाठ मित्रालाही अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2018 04:42 AM2018-11-01T04:42:55+5:302018-11-01T04:43:24+5:30
पीडित मुलगी गरोदर असल्यामुळे महिला पोलिसांच्या चौकशीत तिच्यावर दीपककुमार मंडल (२३) या मित्रानेही अत्याचार केल्याची बाब उघड झाल्यानंतर त्यालाही पोलिसांनी अटक केली. त्याला सहा दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
- जितेंद्र कालेकर
ठाणे : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या सावत्र पित्याला कासारवडवली पोलिसांनी आठवड्यापूर्वी अटक केली होती. पीडित मुलगी गरोदर असल्यामुळे महिला पोलिसांच्या चौकशीत तिच्यावर दीपककुमार मंडल (२३) या मित्रानेही अत्याचार केल्याची बाब उघड झाल्यानंतर त्यालाही पोलिसांनी अटक केली. त्याला सहा दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
घोडबंदर रोडवरील कॉसमॉस साइटजवळ राहणाºया या १६ वर्षीय सावत्र मुलीसोबत ती घरात एकटी असताना माणिक गायकवाड (नावात बदल) तिच्याशी लगट करायचा. कालांतराने २०१६ ते २०१८ या दोन वर्षांच्या कालावधीत त्याने तिचा विरोध डावलून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तिने नकार दिल्यानंतर तिच्या भावाला ठार मारण्याची धमकी देऊन तिच्यावर अत्याचार केले. याचदरम्यान ती गरोदर राहिली. पोटात त्रास झाल्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करावे लागले होते. त्या वेळी तिने सावत्र पित्यामुळेच गरोदर राहिल्याची तक्रार (२२ आॅक्टोबर २०१८) कासारवडवली पोलीस ठाण्यात केली होती.
लहान मुलांवरील लैंगिक अत्याचारापासून प्रतिबंध (पॉक्सो), विनयभंग आणि लैंगिक अत्याचार आदी कलमांन्वये गुन्हा दाखल करून तिच्या नराधम पित्याला पोलिसांनी अटकही केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रेय ढोले, पोलीस निरीक्षक नासीर कुलकर्णी तसेच महिला पोलीस उपनिरीक्षक आर.व्ही. रत्ने यांनीही या प्रकरणात सखोल चौकशी केल्यानंतर मुलगी गरोदर राहिल्याची तारीख आणि तिने सांगितल्याप्रमाणे त्यांच्यात ‘संबंध’ आल्याची तारीख यात विसंगती आढळली. त्यामुळे पोलिसांना संशय आल्याने त्यांनी मुलीकडे पुन्हा कसून चौकशी केली. ती काहीही सांगण्याच्या मन:स्थितीत नव्हती. अखेर, तिला विश्वासात घेतल्यानंतर २३ वर्षीय मित्रानेही तिच्यावर अत्याचार केल्याचे तिने सांगितले. त्यानंतर, पोलिसांनी २९ आॅक्टोबरला दीपककुमार यालाही अटक केली.
डीएनए तपासणी
पित्याच्या विचित्र वागण्यामुळे त्याच्या मुलाने त्याला सहा महिन्यांपूर्वीच घराबाहेर काढले होते. मग, मुलीने सांगितलेल्या दिवशी हा प्रकार कोणी केला, याचा शोध घेतल्यानंतर तिच्या मित्राचे नाव समोर आले. त्यानुसार, पोलिसांनी त्याची डीएनए तपासणी केली. अर्थात, पित्यानेही तिच्यावर सहा महिन्यांपूर्वी अत्याचार केले होते. त्यामुळे यात दोघेही आरोपी असल्याचे उघड झाले.