‘त्या’ काँग्रेस कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:26 AM2021-07-09T04:26:00+5:302021-07-09T04:26:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क भिवंडी : काँग्रेसचे जिल्हा सचिव असल्याचे सांगून तालुक्यातील विविध बांधकाम व्यावसायिकांसह मनपा व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना ...
लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी : काँग्रेसचे जिल्हा सचिव असल्याचे सांगून तालुक्यातील विविध बांधकाम व्यावसायिकांसह मनपा व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना विनाकारण नाहक त्रास देऊन काँग्रेस पक्षासह दलित बहुजन समाजाची बदनामी करणाऱ्या काँग्रेसच्या जिल्हा सचिवावर कारवाई करावी, अशी मागणी शेलार व मीठपाडा येथील सुमारे १२५ नागरिकांनी लेखी निवेदनाद्वारे राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, महसूलमंत्री, जिल्हाधिकारी यांच्यासह राज्याचे पोलीस महासंचालक तसेच जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक व पोलीस आयुक्त तसेच विविध पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
पंकज अशोक गायकवाड (रा. शेलार) असे कथित काँग्रेस जिल्हा सचिवाचे नाव आहे. गायकवाड हा महसूलमंत्री यांच्यासह राज्यातील वरिष्ठ नेत्यांशी माझे चांगले संबंध असल्याचे सांगून भिवंडीतील अनेक बांधकाम व्यावसायिकांच्या बांधकामांवर माहिती अधिकार व तक्रारी करीत असून तक्रारी मागे घेण्यासाठी लाखो रुपयांची खंडणी वसूल करीत असल्याचा आरोप नागरिकांनी निवेदनात केला आहे. भिवंडी तालुक्यातील अनेकांविरोधात तक्रारी करून कारवाईची धमकी देत या सर्वांकडून लाखो रुपयांची खंडणी वसूल करतो. त्याला कोणी फोन करून समज देण्याचा प्रयत्न केला तर थेट जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या अनेक खोट्या तक्रारीदेखील पंकज गायकवाड याने विविध पोलीस ठाण्यात केल्या असल्याचेही गावकऱ्यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे.
बांधकाम व्यावसायिकांकडून समज देण्यासाठी गेलेल्या इसमांना ॲट्रॉसिटी कायद्याचा धाक दाखवत पंकज गायकवाड हा संबंधितांकडून लाखो रुपये वसूल करीत असून आपल्याकडे अशा अनेक तक्रारी येत असल्याचे शेलार ग्रामपंचायतीचे सरपंच ॲड. किरण चन्ने यांनी लेखी निवेदनात नमूद केले आहे.
पंकज गायकवाड याच्याविरोधात अनेक तक्रारी आपल्या कानी येत आहेत. मात्र, त्याची नियुक्ती जिल्हा कमिटीवर असल्याने याविषयी आपण मत व्यक्त करू शकत नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राकेश पाटील यांनी दिली आहे. तर याप्रकरणी माझ्याकडे कोणतीही तक्रार आलेली नाही, तक्रार आल्यास चौकशी करून संबंधितावर योग्य ती पक्षस्तरावरील कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष तथा माजी खा. सुरेश टावरे यांनी दिली आहे.