वैभव गायकवाडला धक्काबुक्की करणाऱ्यांवर होणार गुन्हे दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2024 11:42 AM2024-02-06T11:42:28+5:302024-02-06T11:42:45+5:30
हिललाइन पोलिस ठाण्याबाहेरील नवा व्हिडीओ व्हायरल
लोकमत न्यूज नेटवर्क
उल्हासनगर : आमदार गणपत गायकवाड यांनी पोलिस ठाण्यात केलेल्या गोळीबार प्रकरणातील आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. गायकवाड यांच्या मुलास धक्काबुक्की होत असतानाचा हा व्हिडीओ आहे. पोलिस अधिकाऱ्यांच्या केबिनबाहेर धिंगाणा घालणाऱ्यां विरोधात गुन्हा दाखल करणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
मी केलेल्या गोळीबाराचा सीसीटीव्ही फुटेजमधील व्हिडीओ व्हायरल झाला. मात्र, माझ्या मुलाला झालेल्या धक्काबुक्कीचा व्हिडीओ का समोर आणला जात नाही, असा प्रश्न गायकवाड यांनी उपस्थित केला होता. यानंतर वैभव गायकवाड यांना धक्काबुक्की करतानाचा व्हिडीओ काही वेळातच व्हायरल झाला. शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता जमीनमालक मधुमती जाधव यांच्या तक्रारीवरून गणपत गायकवाड यांच्यासह सात जणांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्याचा जाब विचारण्यासाठी वैभव समर्थकांसह पोलिस ठाण्यात आले. त्यापाठोपाठ महेश गायकवाड, राहुल पाटील, जमीन मालक चैनू जाधव पोलिस ठाण्यात आले. वपोनि अनिल जगताप यांच्या केबिनमध्ये वैभव व महेश यांच्यात चर्चा सुरू असताना आ. गायकवाड तेथे पोहोचले.
रिव्हॉल्व्हर पकडल्याने अनर्थ टळला
केबिनमधून गोळीबाराचा आवाज येत असल्याचे कळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल जगताप केबिनमध्ये गेले. आमदार गायकवाड यांची रिव्हॉल्व्हर काढून घेतल्याने मोठा अनर्थ टळला.
वडील जगताप यांच्या केबिनमध्ये आल्यावर वैभव केबिनमधून बाहेर पडले. त्या दरम्यान पोलिस ठाण्याच्या प्रांगणात दोन्ही समर्थकांत शिवीगाळ, धक्काबुकी व रिव्हॉल्व्हर दाखविण्यात आले.
समर्थकांत आरडाओरडा सुरू झाल्यावर, जगताप तो शांत करण्यासाठी केबिन बाहेर पडले. सीसीटीव्हीत सर्व दिसत होते. वैभव यांना मारहाण होत असल्याचे आमदार गायकवाड यांना सीसीटीव्हीत दिसले. त्यांनी रागाच्या भरात महेश व राहुल यांच्यावर गोळीबार केल्याचे आमदार गायकवाड यांचे समर्थक सांगत आहेत.