कासकर खंडणीप्रकरण : खंडणीतील सोने उधळले बारबालांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 04:00 AM2017-10-10T04:00:36+5:302017-10-10T04:02:07+5:30
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरच्या हस्तकांनी ठाण्यातील एका सराफा व्यावसायिकाकडून खंडणीपोटी उकळलेल्या ४० तोळे सोन्यापैकी जवळपास निम्मे सोने खंडणीविरोधी पथकाने हस्तगत केले.
ठाणे : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरच्या हस्तकांनी ठाण्यातील एका सराफा व्यावसायिकाकडून खंडणीपोटी उकळलेल्या ४० तोळे सोन्यापैकी जवळपास निम्मे सोने खंडणीविरोधी पथकाने हस्तगत केले. यातील काही सोने त्यांनी बारबालांवर उधळल्याची माहितीही पोलिसांना मिळाली आहे.
खंडणीप्रकरणी इक्बाल कासकरसह चौघांना खंडणीविरोधी पथकाने गेल्या महिन्यात अटक केली. जागेच्या वादातून खंडणी उकळल्याचे तीन गुन्हे त्यांच्यावर आहेत. ठाण्यातील एका सराफा व्यावसायिकाकडून या आरोपींनी ४० तोळे सोन्याची खंडणी उकळली होती. त्यापैकी काही सोने आरोपींनी मालाड येथील एका सराफा व्यावसायिकास विकल्याची माहिती पोलिसांना चौकशीदरम्यान मिळाली. त्यानुसार, या व्यावसायिकाकडून आधी १० तोळे आणि आता आणखी १० तोळे सोने पोलिसांनी हस्तगत केले. खंडणी प्रकरणामध्ये या व्यावसायिकाचा साक्षीदार म्हणून वापर करण्याचा विचार खंडणीविरोधी पथक करत आहे. आरोपींनी काही सोने बारबालांना भेट म्हणून दिल्याची माहितीही पोलिसांना मिळाली आहे. या बारबालांचा शोध घेणे आणि त्यांच्याकडून सोने हस्तगत करणे पोलिसांसाठी कठीण झाले आहे.
दरम्यान, खंडणीप्रकरणी अटकेत असलेला छोटा शकीलचा फायनान्सर पंकज गंगर याची सोमवारी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. गंगरला न्यायालयाने यापूर्वी दोन वेळा पोलीस कोठडी सुनावली होती. सोमवारी पोलिसांनी पुन्हा गंगरच्या पोलीस कोठडीची मागणी केली. मात्र, १२ दिवसांची पोलीस कोठडी पूर्ण झाल्याचे सांगून आरोपीच्या वकिलांनी विरोध दर्शवला. त्यानुसार, न्यायालयाने गंगरला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी मंजूर केली.
छोटा शकीलच्या हस्तकाचा शोध सुरू-
पंकज गंगर जवळपास १० वर्षांपासून छोटा शकीलला आर्थिक रसद पुरवत असल्याची माहिती पोलिसांना तपासादरम्यान मिळाली. राजस्थान, गुजरातमध्ये त्याचा मटक्याचा मोठा धंदा आहे. तेथून एका अंगडिया कंपनीमार्फत महिन्याचे १२ ते १५ लाख रुपये तो मुंबईत पाठवायचा. तेथून छोटा शकीलचा एक हस्तक प्रत्येक महिन्यात ही रक्कम घ्यायचा. या हस्तकाचा तपशील पोलिसांना मिळाला आहे. मात्र, सध्या तो भूमिगत असल्याने त्याचा शोध सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.