निकृष्ठ रस्ता तयार करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाका, राष्ट्रवादीची मागणी, ब्रम्हांड भागातही खचला रस्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2019 04:28 PM2019-07-02T16:28:45+5:302019-07-02T16:30:53+5:30
घोडबंदर भागातील ब्रम्हांड सिग्नल जवळील रस्ता देखील खचल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे ज्या ठेकेदाराच्या मार्फत अशी कामे करण्यात आली आहेत. त्याला काळ्या यादीत टाकून रस्त्याच्या कामाची आयआयटी किंवा व्हिजेटीआय मार्फत गुणवत्ता तपासण्याची मागणी राष्ट्रवादीने केली आहे.
ठाणे - घोडबंदर भागात मलनिसारण वाहिन्या टाकण्याच्या कामात झालेल्या हलगर्जीपणामुळे कावेसर आणि आजूबाजूचा पाच किमी पर्यंतचा रस्ता खचल्याची घटना ताजी असतांनाच ब्रम्हांड सिग्नल ते पुढे आझादनगर पर्यंतच्या रस्त्याचीसुध्दा हीच अवस्था झाल्याची बाब समोर आली आहे. परंतु एवढे होऊनही संबधींत ठेकेदावर कारवाई करण्याचे धाडस अद्यापही पालिका प्रशासनाने दाखविले नसल्याने आर्श्चय व्यक्त होत आहे. त्यामुळे आता या सर्व प्रकाराची चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादीचे ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी केली आहे. या रस्त्यांच्या कामांची गुणवत्ता आयआयटी आणि व्हिजेटीआय अशा स्वायत्त संस्थेमार्फत करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
घोडबंदर भागात मलनिसारण वाहीन्या टाकण्यात आल्यानंतर अनेक भागात आता रस्ते खचण्यास सुरवात झाली आहे. शनिवारी कावेसार आणि आजूबाजूच्या भागात नवीन रस्ता खचल्याची घटना घडली होती. आता या रस्त्याची त्याच ठेकेदाराकडून तात्पुरत्या स्वरुपात डागडुजी करण्याचे काम करण्यात येत आहे. ही घटना ताजी असतांनाच सोमवारी रात्री ब्रम्हांड सिग्नल ते आझादनगर पुढे धर्माचा पाडा या भागातही अशाच प्रकारे रस्ता खचल्याची घटना समोर आली आहे. या रस्त्यांचीही आता तात्पुरती मलमपट्टी केली जात आहे. परंतु ज्या ठेकेदाराच्या चुकीमुळे हे प्रकार घडत आहेत, त्याच्यावर कारवाई करण्यासाठी पालिका प्रशासन मात्र पुढे धजावत नसल्याचेच दिसत आहे.
दरम्यान अवघ्या दोन ते तीन महिन्यातच हे रस्ते खचले आहेत. त्यामुळे या रस्त्यांची व्हिजेटीआय अथवा आयआयटी यांच्यामार्फत तपासणी करु न संबधीत ठेकेदार दोषी आढळल्यास त्याला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांना निवेदन दिले असून कारवाईची मागणी केली आहे. सदरच्या रस्त्यांची कामे ही इगल इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीने केले असल्याचे समजत असल्याची माहिती परांजपे यांनी दिली आहे. या कंपनीने हा रस्ता किती निकृष्ठ पद्धतीने केला आहे, याचा पुरावा पहिल्याच पावसात मिळाला आहे. त्यामुळे या रस्त्याच्या बांधकामाची गुणवत्ता व्हिजेटीआय अथवा आयआयटी यांच्यामार्फत तपासून दोषी ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. विशेष म्हणजे इगल इन्फ्रास्ट्रक्चरच्याच सुरु असलेल्या कामातील एका खड्ड्यात पडून सचिन काकोडकर या तरु णाचा मृत्यू झाला होता. त्यावेळी अतिरिक्त आयुक्त समीर उन्हाळे यांनी १९ जूनच्या महासभेत ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिले होते. त्याबाबतही कारवाई करण्यात आलेली नाही. संबधींत ठेकेदाराकडून केलेल्या या निकृष्ठ कामांबाबत चौकशी करु न त्याची माहिती लेखी स्वरुपात जाहीर करावी अन्यथा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ठामपा प्रशासनाच्या विरोधात रस्त्यावर उतरुन आंदोलन करेल असा इशाराही त्यांनी दिला.