ग्रामविकासासाठी जातीने लक्ष घालीन
By admin | Published: April 22, 2016 01:53 AM2016-04-22T01:53:53+5:302016-04-22T01:53:53+5:30
ग्रामविकासाकरिता ग्रामपंचायतस्तरावरून पाठवलेले जे प्रस्ताव प्रलंबित आहेत, ते निकाली काढण्यासाठी स्वत: पुढाकार घेईन, अशी ग्वाही केंद्रीय ग्रामविकास विभागाचे उपसचिव के. संजयन यांनी दिली
लोनाड : ग्रामविकासाकरिता ग्रामपंचायतस्तरावरून पाठवलेले जे प्रस्ताव प्रलंबित आहेत, ते निकाली काढण्यासाठी स्वत: पुढाकार घेईन, अशी ग्वाही केंद्रीय ग्रामविकास विभागाचे उपसचिव के. संजयन यांनी दिली. विकासासाठी नागरिकांनी दाखवलेली एकवाक्यता वाखाण्याजोगी असल्याचे ते म्हणाले.
भिवंडीचे खासदार कपिल पाटील यांनी आदर्श संसद ग्रामयोजनेसाठी निवडलेल्या सोनाळे ग्रामपंचायतीत ‘ग्राम उदय से भारत उदय’ अभियानांतर्गत केंद्रीय ग्रामविकास विभागाचे उपसचिव के. संजयन यांच्या उपस्थितीत गुरुवारी सकाळी ग्रामसभा झाली.
ग्रामविकासाकरिता ग्रामस्थांनी मतभेद बाजूला ठेवावे, असे आवाहन खासदार पाटील यांनी केले. सोनाळे ग्रामपंचायतीचे नाव दिल्लीपर्यंत गेले पाहिजे. आपला आदर्श इतरांना घेता येईल. त्यासाठी मी तुमच्यासोबत आहे, असे आश्वासन त्यांनी दिले. आपण सगळ्यांनी मिळून एकजुटीने हा गाव पुढे नेऊ, असेही ते म्हणाले. ग्रामपंचायतीला विकासकामांच्या निधीसाठी एक कोटीची आवश्यकता असल्याचे ग्रामसेवक के.बी. माळी यांनी सांगितले. तेव्हा पाटील यांनी तीन कोटींचा निधी मिळवून देण्याचे आश्वासन ग्रामसभेला दिले.
या वेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील, उपजिल्हाधिकारी अर्चना कदम, भिवंडीच्या गटविकास अधिकारी करु णा जुईकर, सहायक गटविकास अधिकारी हनुमंत दोडके, सरपंच जनार्र्दन वाकडे, उपसरपंच विनिता थळे, ग्रामसेवक के.बी. माळी, ग्रामपंचायत सदस्य विसुभाऊ म्हात्रे उपस्थित होते. (वार्ताहर)