पदवीधरच्या पात्र मतदार कर्मचाऱ्यांना मतदानासाठी नैमित्तिक रजा- अधिकारी अशोक शिनगारे
By सुरेश लोखंडे | Updated: June 18, 2024 16:53 IST2024-06-18T16:52:39+5:302024-06-18T16:53:22+5:30
विधान परिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदारसंघासाठी येत्या २६ जून राेजी मतदान

पदवीधरच्या पात्र मतदार कर्मचाऱ्यांना मतदानासाठी नैमित्तिक रजा- अधिकारी अशोक शिनगारे
सुरेश लोखंडे, लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: विधान परिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदारसंघासाठी येत्या २६ जून राेजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी मतदार असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाकडून मतदानाचे कर्तव्य पार पाडण्यासाठी विशेष नैमित्तिक रजा मंजूर करण्यात आली, अशी माहिती ठाणे जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे यांनी दिली.
विधान परिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी बुधवारी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत ठाणे जिल्ह्यात मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी मर्यादीत स्वरुपात मतदार असल्याने त्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी राज्य शासनाने कोकण विभाग पदवीधर मतदारसंघातील मतदार असलेल्या कर्मचाऱ्यांना मतदानासाठी विशेष नैमित्तिक रजा मंजूर केली आहे. ही नैमित्तिक रजा अनुज्ञेय असलेल्या नैमित्तिक रजेव्यतिरिक्त असेल. यामुळे ठाणे जिल्ह्यातील पदवीधर मतदारसंघातील मतदार असलेल्या कर्मचाऱ्यांनी या दिवशी मोठ्या प्रमाणात आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन शिनगारे यांनी केले आहे.