कल्याण-डोंबिवलीत हॉटेलमध्ये खानपान सेवा बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2020 12:46 AM2020-10-06T00:46:27+5:302020-10-06T00:46:34+5:30

केवळ पार्सल देण्यावर भर; रात्री साडेदहापर्यंत हॉटेल सुरू ठेवण्यास मुभा देण्याची मागणी

Catering service closed in Kalyan-Dombivali hotel | कल्याण-डोंबिवलीत हॉटेलमध्ये खानपान सेवा बंदच

कल्याण-डोंबिवलीत हॉटेलमध्ये खानपान सेवा बंदच

Next

डोंबिवली : राज्य सरकारने सोमवारपासून ५० टक्के क्षमतेसह हॉटेल सुरू करण्यास मुभा दिली आहे. मात्र, सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत हॉटेल उघडणे आम्हाला परवडणारे नाही. आधीच या व्यवसायाचे प्रचंड नुकसान झाले आहे. सायंकाळची वेळ रात्री १०.३० पर्यंत वाढवून द्यावी, अन्यथा व्यवसाय सुरू करून काहीही फायदा नाही. जोपर्यंत वेळ वाढवून मिळत नाही, तो पर्यंत हॉटेल बंद ठेवलेली बरी, असा पवित्रा कल्याण, डोंबिवलीमधील हॉटेल ओनर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला. त्यामुळे सोमवारी कल्याण-डोंबिवलीतील हॉटेलमध्ये प्रत्यक्ष खानपान सेवा न देता केवळ पार्सल सुरू ठेवण्यावर या व्यावसायिकांनी भर दिला.

कल्याण-डोंबिवलीत सुमारे ४००हून अधिक हॉटेल, बार, छोटे रेस्टोरंट, स्नॅक्स बार आहेत. ते सर्व सोमवारी बंद राहिल्याने खाण्यासाठी आलेल्या खवय्यांचा हिरमोड झाला.

असोसिएनशनचे अध्यक्ष अजित शेट्टी (डोंबिवली), प्रवीण शेट्टी (कल्याण) यांनी सांगितले की, ‘मुळात हॉटेल दोन शिफ्टमध्ये चालतात. त्यात सकाळी ९ ते सायंकाळी ७ अशा विचित्र वेळेत कोणतीही शिफ्ट पूर्ण होत नाही. त्यामुळे कामगारांना कामावर तरी कसे बोलवावे. तसेच हॉटेल, बार हे व्यवसाय सायंकाळी ७ नंतर खºया अर्थाने चालू होतात. त्यामुळे ७ नंतर हॉटेल बंद करण्याला काही अर्थ नाही. नुकसान अधीच झाले आहे त्यात आणखी भर पडेल. त्यामुळे कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची लवकरच भेट घेऊन मुंबईच्या धर्तीवर येथेही व्यवसायाची वेळ वाढवून द्यावी, अशी मागणी करण्यात येणार आहे. त्याबाबतचे पत्र तयार करण्यात येत आहे.’

दरम्यान, ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत हॉटेल बंद ठेवण्यात येणार आहे. केवळ पार्सल सेवा सुरू राहील, या निर्णयावर व्यावसायिक ठाम असल्याचे ते पुढे म्हणाले.

Web Title: Catering service closed in Kalyan-Dombivali hotel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.