कोरोनाच्या तिसऱ्या लाटेवर मात करण्यासाठी सतर्कता आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:45 AM2021-09-22T04:45:23+5:302021-09-22T04:45:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे मुरबाड तालुक्यातील शिवळे येथे सुसज्य कोविड सेंटर उभारले आहे. त्याचा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे मुरबाड तालुक्यातील शिवळे येथे सुसज्य कोविड सेंटर उभारले आहे. त्याचा परिसरातील ग्रामस्थांना मोठा लाभ झाला आहे. यामुळे दुसऱ्या लाटेवर मात करणे शक्य झाले आहे. यासाठी शिवसैनिकांनी दिलेले योगदान वाखाणण्याजोगे आहे. आता संभाव्य तिसऱ्या लाटेवर मात करण्यासाठीही शिवसैनिकांनी सतर्क राहण्याची अपेक्षा ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी शिवसैनिकांच्या सत्कार समारंभात व्यक्त केली.
शिवसेनेचा भगवा मुरबाड तालुक्यात फडकवण्यासाठी सत्पर असलेल्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ रविवारी मुरबाडच्या शिवळे महाविद्यालयात पार पडला. त्याप्रसंगी राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांच्या अपेक्षेस अनुसरून मार्गदर्शन करताना पवार यांनी कोरोनाच्या काळात ग्रामस्थांच्या हितासाठी झटलेल्या शिवसैनिकांच्या कार्याचा गौरव यावेळी केला.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख कांतीलाल कंटे, आप्पा घुडे, राम दुधाळे, पंचायत समिती सदस्य अनिल देसले, रामभाऊ दळवी, शिवसेना महिला आघाडी प्रमुख योगिता शिर्के, उर्मिला लाटे, जिल्हा परिषदेच्या सदस्या रेखा कंटे, बांगर तात्या, गुरुनाथ भुंडेरे, संजय पवार, धनाजी दळवी, आदींची खास उपस्थिती होती. यावेळी नवनियुक्त उपतालुका प्रमुख, विभागप्रमुख, शाखाप्रमुख, उपशाखा प्रमुख, आदी पदाधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला.
----------------