डम्पिंग ग्राउंडवर बसवणार सीसीटीव्ही कॅमेरे
By admin | Published: April 14, 2017 03:19 AM2017-04-14T03:19:54+5:302017-04-14T03:19:54+5:30
शहरातील डम्पिंग ग्राउंडवरील आग रोखण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे. डम्पिंगवर आग लागून गायकवाडपाडा, कैलास कॉलनी
उल्हासनगर : शहरातील डम्पिंग ग्राउंडवरील आग रोखण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे. डम्पिंगवर आग लागून गायकवाडपाडा, कैलास कॉलनी परिसरात धुराचे साम्राज्य निर्माण होऊन नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. ‘डम्पिंग अॅक्शन प्लान’ विषयावर आयुक्त सुधाकर शिंदे यांनी घेतलेल्या बैठकीला महापौर मीना आयलानी, उपमहापौर जीवन इदनानी यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते.
उल्हासनगरातील राणा खदाण डम्पिंग ओव्हरफ्लो होऊन तेथे असलेल्या झोपडपट्टीला धोका निर्माण झाला होता. तेथून डम्पिंग हटवून कॅम्प नं.-५ येथील खडी मशीन येथे तात्पुरते स्थलांतरित करण्यात आले. परिसरातील काही नागरिक नशा करत असल्याने डम्पिंग ग्राउंडवर आगी लावत असल्याची माहिती पालिकेला मिळाली. तेथील आगीचा धूर गायकवाडपाडा, कैलास कॉलनी, टँकर पॉइंट, स्वामी शांतिप्रकाश आश्रम परिसरात पसरतो. धुरामुळे लहान मुलांसह नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. परिसरातील नागरिकांनी एकत्र येऊन डम्पिंग बंद करण्याची मागणी पालिकेकडे केली. मात्र, पर्यायी जागा उपलब्ध नसल्याने पालिकेने आग विझवण्यासाठी विशेष पथके नेमली. सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार अशी माहिती उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिली. (प्रतिनिधी)
कचऱ्याचे होणार वर्गीकरण
डम्पिंगवरील कचऱ्याच्या वर्गीकरणासाठी एका सामाजिक संस्थेची मदत घेण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. तसेच डम्पिंगभोवती कुंपण घालणे, कचऱ्याच्या ढिगाचे सपाटीकरण करणे आदी कामे निविदेची वाट न बघता आवश्यक कामांतर्गत त्वरित करण्यात येणार आहे.