कांदाचोरी रोखण्यासाठी व्यापाऱ्यांनी लावले सीसीटीव्ही कॅमेरे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2019 01:08 AM2019-12-08T01:08:27+5:302019-12-08T06:04:16+5:30
चोरांचा घेतला धसका; ठाण्यातील महात्मा फुले मंडईतील प्रकार
ठाणे : एकीकडे कांद्याने गृहिणींच्या डोळ्यांत पाणी आणले आहे. तर, दुसरीकडे व्यापारीवर्गही कांद्यामुळे दहशतीखाली आला आहे. ठाण्याची मुख्य भाजीमंडई असलेल्या महात्मा फुले मंडईत कांद्याची चोरी वाढली आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून येथील २० ते २५ विक्रेत्यांनी आपल्या दुकानासमोर सीसीटीव्ही कॅमेरे बसवून त्यांची निगराणी २४ तास केली जात आहे. त्यामुळे कांद्याला आता किती महत्त्व आले आहे, हे यावरून स्पष्ट होत आहे.
सध्या कांद्याचे भाव १२० ते १६० रुपये किलोपर्यंत गेले आहेत. मागील आठवड्यात ठाण्यातील मार्केटमधून रात्रीच्या सुमारास ६० किलो कांद्याची गोणी चोरीला गेली होती. तसेच वारंवार अशा प्रकारे कांदाचोरीचे प्रकार या मार्केटमध्ये होत होते. जसा हा कांदा सर्वसामान्यांना रडवडत आहे. तसाच तो व्यापाऱ्यांनाही आता रडण्यास भाग पाडत असल्याचे दिसत आहे. अवकाळी पावसामुळे ही वेळ आल्याचे बोलले जात आहे. यामुळे भाजीमंडईमध्ये आता चौकीदार ठेवण्याची वेळ आली आहे.
विशेष म्हणजे कांद्याची चोरी होऊ नये म्हणून ठाण्यातील भाजीमंडईचे व्यापारी हे रात्रीसुद्धा स्वत: गस्त घालत आहेत. एकीकडे भाज्यांच्या भावाने शंभरी गाठली आहे आणि त्यात कांदा १२० ते १६० रु पये किलो झाला आहे. सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेर होत असलेल्या कांद्यावर चोरांची नजर पडत आहे. यामुळे आता व्यापारी धास्तावले असून कांद्यावर नजर ठेवण्यासाठी त्यांनी वर्गणी काढून सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत.
महागाईमुळे मागणी झाली कमी
महात्मा जोतिबा फुले मंडईमध्ये २० ते २५ कांदा व्यापारी आहेत. रोज येथे शेकडो किलो कांद्यांच्या खरेदीविक्र ीचा व्यवहार होतो. पण, अवकाळी पावसामुळे कांद्याचे दोन हंगाम वाया गेले. त्यामुळे कांद्याची आवक घटली असून किरकोळ बाजारात कांद्याने १६० रु पयांपर्यंत मजल मारली आहे. एक कांदा २० ते ३० रु पये दराने मिळत असल्याने जिथे किलोकिलोने कांदे विकत घेतले जात होते, तेथे आता ग्राहक पाव किलो कांद्याचीही मागणी करताना दिसत आहेत. त्यामुळे ग्राहकांच्याच नव्हे तर व्यापाºयांच्याही तोंडचे पाणी पळाले आहे. व्यापाºयांनी केवळ कॅमेरेच बसवले नाहीत, तर त्याच्यासाठी २४ तास आॅपरेटरची व्यवस्थाही केली आहे. एवढे असूनसुद्धा कांद्याच्या व्यवसायात नफा फार कमी मिळतो, असा त्यांचा दावा आहे.