बदलापुरातील 'त्या' शाळेतील १५ दिवसांचे CCTV फुटेज गायब; शिक्षणमंत्र्यांची धक्कादायक माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2024 06:17 AM2024-08-27T06:17:09+5:302024-08-27T06:17:30+5:30
शाळेतील १५ दिवसांचे सीसीटीव्ही रेकॉर्डिंग का गायब आहे?, याची चौकशी पोलिसांनी करावी, असे केसरकर म्हणाले.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : बदलापूर येथील अल्पवयीन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराचे तीव्र पडसाद उमटत असताना, संबंधित शाळेने मागील १५ दिवसांचे सीसीटीव्हीचे फुटेज गायब केल्याची गंभीर बाब चौकशी समितीच्या अहवालातून उघडकीस आल्याची धक्कादायक माहिती शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. चौकशी समितीचा अहवाल प्राप्त झाला असून, त्यावर शासन बुधवारी निर्णय घेणार आहे. शाळेतील १५ दिवसांचे सीसीटीव्ही रेकॉर्डिंग का गायब आहे?, याची चौकशी पोलिसांनी करावी, असे केसरकर म्हणाले.
१० लाखांची मदत
जिच्यावर अतिप्रसंग झाला तिला १० लाखांची, तर जिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न झाला त्या मुलीला तीन लाख रुपयांची मदत केली जाईल. शिवाय दोघींच्या शिक्षणाच्या खर्चाची जबाबदारी आम्ही उचलू, असे केसरकर म्हणाले.
दोषींवर कारवाई
- कामिनी गायकर आणि निर्मला घुरे या दोन सेविकांवर सहआरोपी करून त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. तपासात काही अधिकारी दोषी आढळल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.
- प्राध्यापक अर्चना आठवले यांना निलंबित केले असून, त्यांनी माहिती लपवल्याचे दिसून येते, असे केसरकर म्हणाले, तसेच व्यवस्थापनाच्या हलगर्जीमुळे कारवाई झाली नव्हती, त्यामुळे त्यांच्यावरसुद्धा कारवाई होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पॅनिक बटन सिस्टम शाळांमध्ये उभारणार
मुलींना अडचणीच्या वेळी तातडीने मदत मिळावी याकरिता शाळांमध्ये पॅनिक बटन सिस्टम उभारली जाणार आहे. हे बटन दाबले तर पोलिस स्टेशनमध्ये तत्काळ माहिती पोहोचेल आणि त्यानंतर ट्रॅकिंग सिस्टममुळे संबंधित व्यक्ती कुठे गेली, याची माहिती पोलिसांना मिळेल. हैदराबादमधील एका कंपनीने हे बटण तयार केले असून, ही सिस्टम ऑफलाइनही चालते, असेही केसरकर यांनी सांगितले.
आरोपी अक्षय शिंदेची रवानगी
कारागृहात बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याला कल्याण न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. पोलिस कोठडीची मुदत सोमवारी संपुष्टात आल्याने पोलिसांनी त्याला न्यायालयासमोर हजर केले. या प्रकरणात पोक्सो अंतर्गत आणखी दोन कलमे लावण्यात आली आहेत.