वाझेंच्या सोसायटीचे सीसीटीव्ही फुटेज एनआयएच्या ताब्यात, इनोव्हा, स्कॉर्पिओ कार ठाण्यात आल्याचा संशय
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 03:16 AM2021-03-16T03:16:06+5:302021-03-16T06:56:01+5:30
मुंबईत सापडलेली स्फोटके ठाण्यातील व्यापारी मनसुख हिरेन यांच्या ताब्यातील स्कॉर्पिओत ठेवली होती. या कारसोबत असलेली इनोव्हा एनआयएने मुंबई पोलिसांच्या वाहनांची देखभाल ठेवली जाते, त्या विभागातून रविवारी ताब्यात घेतली.
जितेंद्र कालेकर -
ठाणे : एनआयएने वाझे यांच्या ठाण्यातील निवासस्थानाबाहेरील ‘सीसीटीव्ही’ फुटेज `साकेत` सोसायटीकडून घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. फुटेजबाबत उलटसुलट चर्चा सुरू असतानाच एनआयए किंवा दहशतवादविरोधी पथक (एटीएस) यांना आपण संपूर्ण सहकार्य करीत असल्याची माहिती सोसायटीने ‘लोकमत’ला दिली. (CCTV footage of vaze's society in NIA possession)
मुंबईत सापडलेली स्फोटके ठाण्यातील व्यापारी मनसुख हिरेन यांच्या ताब्यातील स्कॉर्पिओत ठेवली होती. या कारसोबत असलेली इनोव्हा एनआयएने मुंबई पोलिसांच्या वाहनांची देखभाल ठेवली जाते, त्या विभागातून रविवारी ताब्यात घेतली. त्यामुळे वाझे हे संशयाच्या भोवऱ्यात सापडले. हिरेन यांची स्कॉर्पिओ व मुंबई पोलिसांची इनोव्हा ही वाझे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी आली होती का, याचा तपास एनआयए करीत असून त्याकरिता त्यांना साकेत सोसायटीच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज हवे आहेत. तसेच कांदिवलीच्या तावडे साहेबांचा फोन आल्याचे सांगून घराबाहेर पडलेले मनसुख हिरेन हे वाझेंना भेटायला त्यांच्या निवासस्थानाच्या परिसरात आले होते का, याचा उलगडा होण्याकरिताही हे फुटेज एनआयएला हवे आहे. काही वाहिन्यांवर ती इनोव्हा ठाण्याच्या दिशेने जात असल्याचे फुटेज दाखवले जात आहेत.
या संपूर्ण प्रकरणाची चौकशी एटीएसच्या मुंबई पथकाकडून सुरू आहे. एटीएसच्या ठाणे पथकाने वाझे यांचे निवासस्थान असलेल्या साकेत कॉम्प्लेक्समधील तसेच आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्हींचे चित्रण यापूर्वी घेतले होते. गेल्या दोन दिवसांत साकेत कॉम्प्लेक्समधील सीसीटीव्हींची पडताळणी एनआयएने केली.
सोसायटीचे एटीएस आणि एनआयए या दोन्ही तपास यंत्रणांना संपूर्ण सहकार्य राहील, पोलीस किंवा प्रसारमाध्यमांंनीही आम्हाला सहकार्य करावे, असे या सोसायटीचे अध्यक्ष हेमंत हजारे यांनी सांगितले. सध्या साकेत सोसायटीमध्ये येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येकाची विचारपूस केली जात असून नोंद ठेवण्यात येत आहे.
एटीएसने केली तीन तास चौकशी
रविवारी सुटीचा दिवस वगळता सलग चौथ्या दिवशी एटीएसने सोमवारी पुन्हा मनसुख हिरेन यांचे भाऊ विनोद आणि मुलगा मित यांची दोन ते तीन तास चौकशी केली. या चौकशीतील माहिती मात्र देता येणार नसल्याचे एटीएसच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
राज्य सरकारची भूमिका चुकीची - रामदास आठवले
- स्फाेटक कार प्रकरणात सुरुवातीपासूनच राज्याच्या महाविकास आघाडी सरकारने संशयास्पद असणाऱ्या सचिन वाझेंना पाठीशी घालण्याची चुकीची भूमिका घेतल्याचा आरोप केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला.
- विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व विरोधी नेत्यांनी सुरुवातीपासून वाझेंना अटक करण्याची मागणी केली हाेती. मात्र राज्य सरकारने त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला.
- असे अधिकारी मुंबई पोलिसांच्या चांगल्या प्रतिमेला बाधा ठरतात, असे आठवले म्हणाले. वाझे यांची भूमिका संशयास्पद असूनही महाराष्ट्र पोलिसांनी त्यांना अटक केली नाही. पोलिसांवर राज्य सरकारचा दबाव होता, असेही आठवले म्हणाले.