बिबटयांवर आता सीसीटीव्ही वॉच!
By admin | Published: September 26, 2016 02:10 AM2016-09-26T02:10:52+5:302016-09-26T02:10:52+5:30
ठाणेकरांना संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बिबट्यापासून सुरक्षित ठेवून त्याच्या हालचाली टिपण्यासाठी आता येऊर जंगल व उपवन तलाव परिसरात ठिकठिकाणी सुमारे १०
सुरेश लोखंडे, ठाणे
ठाणेकरांना संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बिबट्यापासून सुरक्षित ठेवून त्याच्या हालचाली टिपण्यासाठी आता येऊर जंगल व उपवन तलाव परिसरात ठिकठिकाणी सुमारे १० सीसीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. त्यात बिबट्याच्या हालचाली कैद झाल्या आहेत.
येऊरचे विस्तीर्ण जंगल व उपवनला लागून असलेल्या या उद्यानात वन्यजीव, प्राणी मुक्त संचार करीत आहेत. लोकमान्यनगर, इंदिरानगर, वागळे इस्टेट, मुलुंड परिसरातील श्रीनगर, वैशालीनगर, घोडबंदर परिसर, कोकणीपाडा, पटणीपाडा, येऊरगाव, वनीचापाडा, जांभूळपाडा आणि पाटीलपाडा या रहिवासी भागांत पावसाच्या या कालावधीत भक्ष्य शोधण्याच्या इराद्याने बिबटे येण्याची दाट शक्यता लक्षात घेऊन सावध पवित्रा घेऊन वन विभागाने हे सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. सध्या १० ठिकाणी ते बसविले आहेत.
लोकमान्यनगर व मुलुंडच्या सिंधी कॉलनी परिसरात याआधी बिबट्या शिरल्याच्या घटना घडलेल्या आहेत. याशिवाय, येऊरच्या आदिवासीपाड्यांमध्येही त्याने स्थानिकांना दुखापती केल्या आहेत. एवढेच नव्हे तर मुलुंडच्या शंकर टेकडी भागातून बिबट्याने दोन वर्षांपूर्वी मुलीला उचलून नेल्याची घटना घडलेली आहे. तर, आजमितीस मुरबाड तालुक्यातीत टोकावडे गावाजवळील मोरोशी, सोनावळे, सिंगापूर परिसरात सध्या त्याने हैदोस घातला आहे. दोन ज्येष्ठ स्त्रीपुरुषांचा जीव घेणाऱ्या बिबट्याला पकडण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली जात आहे. या घटनांच्या पार्श्वभूमीवर वन विभागाने नागरी वस्त्यांजवळच्या जंगलातील वन्य प्राण्यांच्या हालचालींवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे येऊर, उपवन तलाव परिसरात उपाययोजना व संभाव्य धोके टाळण्यासाठीयेथे वावरणाऱ्या बिबट्यावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे पाळत ठेवली जात आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात या परिसरातील एकीकडे सोयीसुविधांची सुबत्ता आहे. याच भागाला लागून असलेल्या येऊरच्या आदिवासींच्या जांभूळ, वनीचापाड्यात तर अंधाराचे साम्राज्य आहे.
येऊर गावाला लागून असलेल्या पाटोळेपाड्यासह परिसरातील आदिवासी वस्त्यांमधील कुत्रे, कोंबड्या या राष्ट्रीय उद्यानातील बिबट्यांनी फस्त केले आहेत. यामुळे रात्रीच्या अंधारात कुत्र्यांचे भुंकणेही ऐकायला मिळत नाही. यामुळे या लोकवस्त्यांमध्ये बिबटे उघडपणे फिरत असल्याचे सिद्ध झाले आहे.
बिबट्यापासून जीवितहानी होण्याची शक्यता लक्षात घेऊन जंगलास लागून असलेल्या नागरी व आदिवासी वस्त्यांच्या आजूबाजूला हे सीसीटीव्ही लावण्यासाठी वन विभागाने पुढाकार घेतला आहे.