सीसीटीव्हीमुळे ग्रामीण भागातील गुन्हेगारीला बसेल आळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:28 AM2021-06-25T04:28:11+5:302021-06-25T04:28:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वज्रेश्वरी : भिवंडी-वाडा या राज्य मार्गासह वज्रेश्वरी, गणेशपुरी येथील तीर्थक्षेत्र व पर्यटनस्थळांमुळे या भागात वाढत्या गुन्हेगारी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
वज्रेश्वरी : भिवंडी-वाडा या राज्य मार्गासह वज्रेश्वरी, गणेशपुरी येथील तीर्थक्षेत्र व पर्यटनस्थळांमुळे या भागात वाढत्या गुन्हेगारी कारवायांवर गणेशपुरी पोलिसांनी लावलेल्या सीसीटीव्हीमुळे अंकुश बसेल, असा विश्वास ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी व्यक्त केला.
गणेशपुरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांच्या संकल्पनेतून गणेशपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत लावलेल्या ४७ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा लोकार्पण सोहळा गुरुवारी झाला. जाधव यांनी सफाळे पोलीस ठाण्यात असताना संपूर्ण पोलीस ठाण्याच्या हद्दीत सीसीटीव्ही लावले होते. त्या वेळी गुन्हेगारीला आळा बसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी गणेशपुरी पोलीस ठाण्यामध्ये बदली झाल्यानंतर या उपक्रमाची येथे गरज असल्याचे जाणवल्याने त्यांनी या ठिकाणी सीसीटीव्ही लावण्याचे ठरवले. परंतु गणेशपुरी पोलीस ठाण्याची हद्द मोठी असल्याने आणि या हद्दीत अंबाडी ते उसगाव हा राज्यमार्ग क्र. ८१ मधील १२ किमीचा मार्ग आणि अंबाडी ते अनगाव हा राज्यमार्ग क्र. ७६ मधील १२ किमीचा मार्ग जात असल्याने आणि वज्रेश्वरी, अकलोली अशी मोठी तीर्थक्षेत्रे असल्याने मोठ्या संख्येने सीसीटीव्ही लावण्याची गरज होती. ही मोठी खर्चीक बाब होती तरीही जाधव यांनी कोणत्याही परिस्थितीत उपक्रम राबविण्याचे ध्येय मनाशी बाळगले. त्यांनी दानशूर व्यक्तींना आवाहन केले. उद्योजक सुरेंद्र कल्याणपूर यांनी ११ लाखांची मदत केली आणि अमित राऊत यांनी ४७ पोल उपलब्ध करून दिले. रवदी ते अनगाव टोलनाका येथे भूमिगत केबल टाकण्याचा प्रश्न निर्माण झाल्यावर केबल टाकण्याच्या कंपनीतील वरिष्ठ अधिकारी एम.पी. सिंग यांनी त्यांची यापूर्वी असलेल्या केबलमधून एक कोअर उपलब्ध करून दिली.
या वेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक स्मिता पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप गोडबोले, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे, वज्रेश्वरी शिक्षण प्रसारक मंडळाचे चंद्रकांत भोईर, दिलीप पाटील, गणेशपुरी ग्रामपंचायतीचे उपसरपंच विनोद पाटील आदी उपस्थित होते. याप्रसंगी या उपक्रमाला मदत करणाऱ्या दानशूर व्यक्तींचा देशमाने यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
---------------------------------------------------------
राज्य मार्गावर बसवले ३६ कॅमेरे
भिवंडी-वाडा राज्यमार्ग व अंबाडी ते उसगाव हे राज्यमार्ग जात असून या मार्गावर ३६ कॅमेरे बसविण्यात आले असून त्यामध्ये वाहनांचे नंबर टिपणारे एएनपीआर कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तर अकलोली येथील गरम पाण्याचे कुंड व नदी क्षेत्रात ७ व गणेशपुरी परिसरात २ सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत.