सी.डी. देशमुख संस्थेची सात मजली इमारत उभारली जाणार - प्रताप सरनाईक
By अजित मांडके | Published: January 31, 2024 03:31 PM2024-01-31T15:31:24+5:302024-01-31T15:31:56+5:30
बुधवारी सरनाईक यांनी या संदर्भात ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांची भेट घेतली.
ठाणे : ठाण्यात युपीएसीचे विद्यार्थी घडविणाऱ्या ठाणे महापालिकेच्या सी.डी. देशमुख या संस्थेची आता ठाण्यात सात मजल्यांची इमारत उभारली जाणार आहे. त्यात २०० मुला, मुलींसाठीचे वसतीगृहाचा देखील समावेश असेल अशी माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली. एकूणच देशातील ही संस्था ठरणार असून येत्या ९ फेब्रुवारी त्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
बुधवारी सरनाईक यांनी या संदर्भात ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांची भेट घेतली. त्यानंतर घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. सी. डी. देशमुख संस्थेच्या माध्यमातून स्पर्धा परिक्षेच्या माध्यमातून यु.पी.एससीचे अनेक विद्यार्थी घडविण्यात आले आहेत. त्यामुळे या संस्थेची स्वतंत्र इमारत असावी अशी मागणी करण्यात आली होती. त्या नुसार सरनाईक यांच्या मतदार संघात असलेल्या वर्तकनगर भागात ही इमारत आता आकार घेणार आहे. त्यासाठी २५ कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे.
ही संस्था ठाण्याचे वैभव असल्याने महापालिका याचा खर्च करेल असे आयुक्तांनी आश्वासन दिले आहे. परंतु पालिकेची आर्थिक स्थिती पाहता, हा खर्च राज्य शासनाने करावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले. ही इमारत सात मजल्यांची असणार आहे, या इमारतीत १०० विद्यार्थींनीसाठी आणि १०० विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह देखील असणार आहे.
याशिवाय या ठिकाणी अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले राहावे या उद्देशाने जीम उभारली जाणार आहे. तसेच वाचनालय, प्रशस्त हॉल व इतर सोई सुविधा देखील उपलब्ध करुन दिल्या जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. या इमारतीचे प्रत्यक्षात काम सुरु झाल्यानंतर १८ महिन्यात ते पूर्ण केले जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.