सीडीआर प्रकरणातील आरोपीच्या कोठडीत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 06:35 AM2018-05-15T06:35:26+5:302018-05-15T06:35:26+5:30
बेकायदेशीर सीडीआर (कॉल्सचा तपशील) मिळवणाऱ्या सांताक्रुझ येथील एका खासगी गुप्तहेराची पोलीस कोठडी न्यायालयाने सोमवारी आणखी तीन दिवसांनी वाढवली.
ठाणे : बेकायदेशीर सीडीआर (कॉल्सचा तपशील) मिळवणाऱ्या सांताक्रुझ येथील एका खासगी गुप्तहेराची पोलीस कोठडी न्यायालयाने सोमवारी आणखी तीन दिवसांनी वाढवली. ११ मे रोजी पोलिसांनी त्याला अटक केली होती.
सीडीआर प्रकरणात ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या घटक क्रमांक १ने यापूर्वी कीर्तेश कवी याला अटक केली होती. सांताक्रुझ येथील खासगी गुप्तहेर लक्ष्मण ठाकूर याने त्याच्याकडून काही सीडीआर बेकायदेशीरपणे मिळवल्याची माहिती तपासात निष्पन्न झाली होती. त्यानुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे आणि पोलीस निरीक्षक रणवीर बयेस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रेय सरक यांनी ठाकूरला ११ मे रोजी अटक केली. त्याने कीर्तेश कवीकडून कुणाकुणाचे सीडीआर मिळवले, ते कुणाला पुरवले आणि त्यामागे त्याचा उद्देश काय होता, याची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
लक्ष्मण ठाकूर याची या प्रकरणातील इतर काही आरोपींप्रमाणे स्वत:ची गुप्तहेर संस्था नव्हती. जस्ट डायल या संकेतस्थळावर स्वत:चा मोबाइल नंबर टाकून, त्या माध्यमातून त्याचा गुप्तहेरीचा व्यवसाय सुरू होता. कीर्तेश कवीच्या नियमित संपर्कात तो होता. या प्रकरणातील आरोपींनी मोबाइल कंपन्यांकडून बेकायदेशीरपणे सीडीआर मिळवल्याचा आरोप आहे. त्यासाठी त्यांनी पोलीस अधिकाºयांच्या शासकीय ई-मेल्सचा दुरुपयोग केल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे.
ग्राहकांना सीडीआर काढून देण्याच्या मोबदल्यात त्याची कुवत आणि गरज बघून आरोपी कामाचे पैसे वसूल करायचे. या आर्थिक व्यवहारामध्ये लक्ष्मण ठाकूरचा सहभाग निष्पन्न होत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.