सीडीआर प्रकरण आरोपींच्या अटकेसाठी पाच पथके स्थापन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 05:10 AM2018-02-06T05:10:01+5:302018-02-06T05:10:09+5:30
बेकायदेशीर मार्गाने सीडीआर (कॉल्सचा तपशील) मिळवून त्याची विक्री करणा-या चार आरोपींचा ठाणे पोलिसांकडून शोध सुरू आहे.
ठाणे : बेकायदेशीर मार्गाने सीडीआर (कॉल्सचा तपशील) मिळवून त्याची विक्री करणा-या चार आरोपींचा ठाणे पोलिसांकडून शोध सुरू आहे. आरोपींच्या अटकेसाठी पाच पथके स्थापन करण्यात आली असून ती वेगवेगळ्या शहरांमध्ये रवाना केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
देशातील पहिली महिला गुप्तहेर रजनी पंडित यांना गुन्हे अन्वेषण शाखेच्या घटक क्रमांक-१ ने शुक्रवारी अटक केली. ग्राहकांकडून आलेल्या वेगवेगळ्या प्रकरणांच्या तपासाकरिता संबंधितांच्या मोबाइल फोनचे सीडीआर काढणे खासगी गुप्तहेरांसाठी अगदी सहज होते, हे पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी आतापर्यंत पंडित यांच्यासह सात खासगी गुप्तहेरांना पोलिसांनी अटक केली. सर्व आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहेत. दिल्लीतील सौरव साहू हा या प्रकरणाचा सूत्रधार असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे त्याचा आणि मुंबई येथील त्याच्या तीन हस्तकांचा पोलीस कसून शोध घेत आहेत. आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी पाच पथके स्थापन केली असून त्यापैकी एक पथक दिल्लीत आहे. मोबाइल कंपन्यांकडून आरोपी सीडीआर नेमका कसा मिळवायचे, ते कुणाकुणाला विकायचे, यासह या प्रकरणाशी संबंधित इतर मुद्यांचा खुलासा साहू याच्या अटकेनंतर होऊ शकेल, अशी माहिती पोलिसांनी दिली.
>सीडींची पडताळणी
आरोपींकडून पोलिसांनी जवळपास एक हजार सीडी हस्तगत केल्या आहेत. त्यामध्ये खासगी गुप्तहेरांनी हाताळलेल्या वेगवेगळ्या प्रकरणांशी संबंधित तपशील आहे. या सीडींमध्ये मोठ्या प्रमाणात चित्रफितीदेखील आहेत. ग्राहकाच्या सांगण्यावरून कुणावर पाळत ठेवली असेल, तर त्याच्या चित्रफितीही सीडींमध्ये आहेत. या सीडींची पडताळणी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ंग्राहकांचीही चौकशी
गुप्तहेरांकडून ज्या मोबाइल नंबर्सचे सीडीआर हस्तगत करण्यात आले, त्या मोबाइलधारकांची चौकशी करण्याची तूर्तास गरज नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. मात्र, लोकांचे सीडीआर काढण्याचे काम गुप्तहेरांना ज्यांनी दिले, त्यांची चौकशी केली जाणार आहे. यातून त्यांचा उद्देश जाणून घेणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.