सीडीआर प्रकरण : कंगणा रानौत, आयेशा श्रॉफचीही चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 01:34 AM2018-03-21T01:34:11+5:302018-03-21T01:34:11+5:30
बेकायदेशीर सीडीआर प्रकरणामध्ये अभिनेत्री कंगणा रानौत आणि जॅकी श्रॉफ यांच्या पत्नी आयेशा श्रॉफ यांची नावे मंगळवारी समोर आली. त्यांची यासंदर्भात लवकरच चौकशी केली जाणार आहे.
- राजू ओढे
ठाणे : बेकायदेशीर सीडीआर प्रकरणामध्ये अभिनेत्री कंगणा रानौत आणि जॅकी श्रॉफ यांच्या पत्नी आयेशा श्रॉफ यांची नावे मंगळवारी समोर आली. त्यांची यासंदर्भात लवकरच चौकशी केली जाणार आहे.
सीडीआर प्रकरणात गुन्हे अन्वेषण शाखेच्या घटक क्रमांक १ ने शुक्रवारी रात्री अॅड. रिझवान सिद्दीकी यांना अटक केली. त्यांच्या लॅपटॉप आणि मोबाईल फोन्सची पडताळणी सुरू आहे. यात पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली. कंगणा आणि हृतिक रोशन यांचा वाद सर्वश्रुत आहे. कंगणाने सिद्दीकींना मोबाईलवर केलेले मेसेज पोलिसांना मिळाले आहेत. एका मेसेजमध्ये कंगणाने हृतिकचा मोबाईल नंबर सिद्दीकीना पाठवला आहे. हृतिकचा सीडीआर मिळवण्यासाठी कंगणाने त्याचा मोबाईल पाठवला होता का, याची चौकशी पोलीस करणार आहेत. त्यासाठी कंगणाला नोटीस बजावणार असल्याचेही पोलिसांनी सांगितले.
दुसरे प्रकरण जॅकी श्रॉफ यांच्या पत्नी आणि टायगर श्रॉफची आई आयेशा श्रॉफ यांचे आहे. आयेशा आणि अभिनेता साहील खान यांच्यातील संबंध न्यायप्रविष्टही झाले. आयेशानी साहिलच्या मोबाईल सीडीआर कुठून तरी मिळवला. तो तिने सिद्दीकींना पुरवल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे आयेशा यांनाही समन्स बजावणार आहे.
आणखी एका अभिनेत्रीची तक्रार
बेकायदेशीर सीडीआर प्रकरणामध्ये बॉलिवूडच्या आणखी एका अभिनेत्रीने मंगळवारी ठाणे पोलिसांकडे तक्रार केली आहे. पोलिसांनी तिला सविस्तर जबाब नोंदविण्यास सांगितले आहे. तीन वर्षांपूर्वी या अभिनेत्रीने महाराष्ट्राचे तत्कालीन पोलीस महासंचालक सुनील पारसकर यांच्याविरुद्ध लैंगिक शोषणाची तक्रार केली होती. या प्रकरणात अॅड. रिझवान सिद्दीकी हे सक्रिय होते, असा आरोप या अभिनेत्रीने केला. आपल्या मोबाईल फोनचा सीडीआरही अॅड. सिद्दीकी यांनी काढल्याचा संशय तिने व्यक्त केला आहे.