सीडीआर प्रकरण:परराज्यांतील पोलीसही संशयाच्या भोवऱ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 06:33 AM2018-03-26T06:33:18+5:302018-03-26T06:33:18+5:30
बेकायदेशीर सीडीआर (कॉल्सचा तपशील) प्रकरणामध्ये परराज्यातील काही पोलिसांचाही सहभाग उघडकीस येत आहे
ठाणे : बेकायदेशीर सीडीआर (कॉल्सचा तपशील) प्रकरणामध्ये परराज्यातील काही पोलिसांचाही सहभाग उघडकीस येत आहे. या आरोपावर शिक्कामोर्तब करणारी माहिती ठाणे पोलिसांना मोबाइल कंपन्यांकडून मिळाली आहे.
मोबाइल फोनचे सीडीआर बेकायदेशीररीत्या मिळवणाºया टोळीचा पर्दाफाश ठाणे पोलिसांनी जानेवारी महिन्यात केला. या प्रकरणी काही खासगी गुप्तहेरांसह यवतमाळच्या एका पोलीस कर्मचाºयाला पोलिसांनी अटक केली होती. आतापर्यंत १२ आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून २६४ सीडीआर पोलिसांनी हस्तगत केले. हे सीडीआर कुणाला पुरवले, याची माहिती ठाणे पोलिसांनी मोबाइल कंपन्यांकडून मागवली होती. त्यापैकी १६० क्रमांकांची माहिती मोबाइल कंपन्यांच्या नोडल आॅफिसर्सने पोलिसांना दिली आहे. त्यानुसार, काही मोबाइल नंबर्सचे सीडीआर मिळवण्यासाठी पोलीस अधिकाºयांचे ई-मेल आयडी वापरल्याचे स्पष्ट झाले आहे.
वेगवेगळ्या राज्यांमधील पोलीस आयुक्तालयांमधून हे सीडीआर मागवण्यात आले होते. पोलीस यंत्रणांकडून तपासकामी वेगवेगळ्या मोबाइल नंबर्सचे सीडीआर मोबाइल कंपन्यांकडून वेळोवेळी मागवले जातात. त्यामुळे हे सीडीआर पोलीस यंत्रणेने तपासकामी मागवले आणि ते संबंधित अधिकाºयांनीच मागवले की नाही, याचीही माहिती ठाणे पोलिसांकडून घेतली जाणार आहे.
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींमध्ये सायबरतज्ज्ञ अजिंक्य नागरगोजे याचाही समावेश आहे. त्याने यवतमाळ पोलीस अधीक्षकांच्या ई-मेल आयडीचा पासवर्ड चोरून काही सीडीआर मागवल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. या गुन्ह्यामध्ये त्याला यवतमाळचा पोलीस कर्मचारी नितीन खवडे याने मदत केली होती. त्यामुळे पोलिसांनी खवडेलाही अटक केली होती. आता मोबाइल कंपन्यांनी दिलेले १६० सीडीआर काढताना पोलीस अधिकाºयांच्या ई-मेलचा अशाच प्रकारे दुरुपयोग झाला का, हे ठाणे पोलीस तपासून पाहणार आहेत. मोबाइल कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार हे सीडीआर पोलीस आयुक्तालयासह ग्रामीण पोलिसांनीही मागवले आहेत. तपासाच्या कार्यकक्षेमध्ये परराज्यांतील पोलिसांचा मुद्दा समोर आल्याने कारवाईची दिशा वरिष्ठांच्या मार्गदर्शनानंतर निश्चित केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.