सीडीआर प्रकरण : रिझवान सिद्दिकींनी कॉल्स रेकॉर्ड केले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 12:28 AM2018-03-20T00:28:19+5:302018-03-20T00:28:19+5:30
कौटुंबिक प्रकरणामध्ये अॅड. रिझवान सिद्दिकी यांनी आपले कॉल्स रेकॉर्ड केल्याचा आरोप आकृती नागपाल या तेलुगू अभिनेत्रीने सोमवारी पोलिसांकडे केला. ठाण्याच्या गुन्हे अन्वेषण शाखेने तिचा जबाब नोंदवला असून या प्रकरणी तिला साक्षीदार म्हणून वापरले जाणार आहे.
ठाणे : कौटुंबिक प्रकरणामध्ये अॅड. रिझवान सिद्दिकी यांनी आपले कॉल्स रेकॉर्ड केल्याचा आरोप आकृती नागपाल या तेलुगू अभिनेत्रीने सोमवारी पोलिसांकडे केला. ठाण्याच्या गुन्हे अन्वेषण शाखेने तिचा जबाब नोंदवला असून या प्रकरणी तिला साक्षीदार म्हणून वापरले जाणार आहे.
बेकायदेशीर सीडीआर प्रकरणात गुन्हे अन्वेषण शाखेच्या घटक क्रमांक-१ ने शुक्रवारी रात्री अॅड. रिझवान सिद्दिकी यांना अटक केली. सिद्दिकी बॉलीवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी यांचे वकील आहेत. ठाणे पोलिसांनी नवाजुद्दीन सिद्दिकी, त्यांची पत्नी आणि अॅड. रिझवान सिद्दिकी यांना चौकशीसाठी नोटीस बजावली होती. सीडीआर प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या एका आरोपीकडून सिद्दिकी यांनी बेकायदेशीररीत्या सीडीआर मिळवल्याचा आरोप आहे. नोटीस बजावूनही चौकशीसाठी हजर न झाल्याने पोलिसांनी शुक्रवारी रात्री त्यांना अटक केली. ते सध्या पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत आहेत.
त्यांचे तीन मोबाइल फोन्स आणि दोन लॅपटॉपमधल्या माहितीचे विश्लेषण सुरू असताना, सोमवारी त्यांच्याविरोधात दोन तक्रारी पोलिसांकडे आल्या. त्यापैकी एक तक्रार आकृती नागपाल या तेलुगू अभिनेत्रीची आहे. तिने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तिचा पती आणि अॅड. सिद्दिकी हे मित्र आहेत. २०१४ साली तिच्या पतीने मुंबई न्यायालयात घटस्फोटासाठी याचिका दाखल केली. तिच्या पतीचे वकीलपत्र अॅड. सिद्दिकींनी घेतले होते. खटला सुरू असताना एका सुनावणीला अॅड. सिद्दिकी यांनी एका पेनड्राइव्हमध्ये आपल्या मित्रांसोबतचे काही कॉल रेकॉर्ड न्यायालयामध्ये सादर केले. अॅड. सिद्दिकींनी आपल्या मोबाइल फोनचा सीडीआर बेकायदेशीररीत्या मिळवला असावा, अशी शंकाही या अभिनेत्रीने व्यक्त केली. या अभिनेत्रीचा जबाब नोंदवण्यात आला असून तिला या प्रकरणामध्ये साक्षीदार म्हणून वापरले जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दुसरी तक्रार मुंबईच्या एका व्यापाऱ्याने पोलिसांकडे केली. या व्यापाºयाची दुसºया एका व्यापाºयासोबत व्यवसायामध्ये भागीदारी होती. कालांतराने व्यावसायिक वाद होऊन त्यांची भागीदारी संपुष्टात आली. त्यांच्यातील वाद न्यायप्रविष्ट झाल्यानंतर आपण कुणाकुणाच्या संपर्कात आहोत, मोबाइल फोनवर कधी आणि कुणाशी बोललो, हेदेखील अॅड. सिद्दिकी यांना माहीत असायचे. या व्यापाºयाचा जबाब नोंदवून त्यालाही या प्रकरणामध्ये साक्षीदार म्हणून वापरले जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.
सीडीआर प्रकरणामध्ये एका तेलुगू अभिनेत्रीसह मुंबईच्या एका व्यापाºयानेही पोलिसांशी स्वत:हून संपर्क साधला. त्यांनी या प्रकरणाशी संबंधित महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांचा या प्रकरणी साक्षीदार म्हणून वापर केला जाईल.
- अभिषेक त्रिमुखे, पोलीस उपायुक्त गुन्हे, ठाणे