हिरेन रात्रभर कोठे होते ते समजणार सीडीआरमधून

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2021 03:10 AM2021-03-07T03:10:27+5:302021-03-07T03:10:51+5:30

मोबाईल गायब : संभाषणाचा काढला जाणार माग

From the CDR you will understand where Hiren was all night | हिरेन रात्रभर कोठे होते ते समजणार सीडीआरमधून

हिरेन रात्रभर कोठे होते ते समजणार सीडीआरमधून

Next
ठळक मुद्देस्फाेटके असलेल्या स्काॅर्पिओ कारचे गूढ उकलण्यापूर्वी या कारच्या मालकाचा संशयास्पद मृत्यू झाला. हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूबाबत तपास यंत्रणांच्या हाती अद्याप ठोस माहिती लागलेली नाही.

मुंबई/ ठाणे :  अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांसह सापडलेल्या स्काॅर्पिओचे मालक मनसुख हिरेन यांना मृत्युपूर्वी दोन दिवस आधी आलेले कॉल आणि अखेरचा फोन कोणाचा आला होता, त्यांनी कोणाशी संभाषण केले, आदल्या दिवशी घर सोडल्यानंतर त्यांचा मृतदेह सापडेपर्यंत ते कोठे होते, याचा उलगडा व्हावा म्हणून त्यांच्या मोबाईलचा सीडीआर काढला जात असल्याची माहिती एटीएसच्या अधिकाऱ्यांनी दिली.  

स्फाेटके असलेल्या स्काॅर्पिओ कारचे गूढ उकलण्यापूर्वी या कारच्या मालकाचा संशयास्पद मृत्यू झाला. हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूबाबत तपास यंत्रणांच्या हाती अद्याप ठोस माहिती लागलेली नाही. त्यांचा मोबाइलही गायब आहे. सध्या सर्वत्र चर्चेचा विषय बनलेल्या या प्रकरणाची पाळेमुळे खणून काढण्यासाठी  महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) नव्याने युद्धपातळीवर तपास सुरू केला आहे. पेडर रोड येथील अँटिलिया बंगल्याचा परिसर आणि मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडलेल्या मुंब्रा खाडीचा परिसर त्यांनी पुन्हा धुंडाळून काढला. विविध पथके स्थापन करून सर्व शक्यता पडताळून संशयास्पद बाबी पडताळून पाहिल्या जात आहेत. या प्रकरणाचा तपास मुंबई क्राईम बँचकडून शनिवारी एटीएसकडे वर्ग करण्यात आला. त्यामुळे एटीएसचे जयजीत सिंह यांनी सकाळी घटनास्थळी जाऊन सर्व माहिती घेतली. मृत हिरेन यांच्या मृतदेहाची पाहणी करून काही सूचना केल्या.
हिरेन यांच्या शवविच्छेदनाचा अहवाल शनिवारी मिळाला. त्यात त्यांच्या शरीरावर कोणत्याही खुणा किंवा जखमा नसल्याचे नमूद आहे. मात्र मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट करण्यात आलेले नाही. त्यामुळे मृत्यू कसा झाला, याचे गूढ कायम आहे. सीडीआरमध्ये ज्यांचे नंबर आढळतील त्यांना चौकशीसाठी बाेलावले जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

तावडे नावाच्या व्यक्तीला ओळखत नाही - सचिन वाझे

मुंबई : संशयास्पदरित्या मरण पावलेले व्यापारी मनसुख हिरेन यांना फोन करून बोलावणाऱ्या तावडे नावाच्या व्यक्तीला मी ओळखत नाही, त्याच्याशी माझा कसलाही संबंध नाही, तपासाच्या अनुषंगाने हिरेन यांच्याकडे मी चौकशी करत होतो, असे मुंबई गुन्हा अन्वेषण शाखेतील सहायक निरीक्षक सचिन वाझे यांनी स्पष्ट केले.

हिरेन याचे कुटुंबीय आणि विरोधी पक्षांनी सहायक निरीक्षक वाझे यांच्यावर आक्षेप घेतला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वाझे यांचे गेल्यावर्षी जूनमध्ये हिरेन यांच्याशी संभाषण झाले होते, असा दावा करत कार चोरीला गेल्यानंतर ते क्रॉफर्ड मार्केट येथे कोणाला भेटायला गेले होते, हा प्रश्न उपस्थित केला होता. त्याबद्दल वाझे यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी विरोधी पक्षाच्या आरोपाबाबत काहीही सांगण्यास नकार दिला.  मात्र, तावडे नावाच्या व्यक्तीला ओळखत नाही. हिरेन याचे कुटुंबीय आणि विरोधी पक्षांनी सहायक निरीक्षक वाझे यांच्यावर आक्षेप घेतला आहे. स्फोटकाच्या कारचा तपास सहायक आयुक्त नितीन हालकरे यांच्याकडे होता, त्यांना आपण सहकार्य करीत होतो, असे स्पष्ट केले.

Web Title: From the CDR you will understand where Hiren was all night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.